दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वोसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या चांगलेच पेचप्रसंगात अडकले आहेत. आपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक दिग्गजांनी नकार दिल्याने त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचे सुत्रांकडून कळते. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

पुढच्या महिन्यांत दिल्लीत राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. दिल्ली विधानसभेत पूर्ण वर्चस्व असल्याने आप या तीनही जागा जिंकू शकते. मात्र, यासाठी कोणते उमेदवार पाठवायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. सात जणांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आपशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक दिग्गजांनी यासाठी नकार दिल्याचेही कळते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया उद्या, शनिवारपासून सुरु होणार असून ५ जानेवारी रोजी ती संपणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे.

आपच्या सुत्रांनुसार, पक्षाचे नेते कुमार विश्वास यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार नाही. कुमार विश्वास यांच्या समर्थकांनी त्यांच्या उमेदवारीविरोधात शुक्रवारी सकाळी दिल्लीत आपच्या मुख्यालयात चार तास आंदोलन केले होते. आपच्या राजकीय प्रकरणांवर निर्णय घेणारी समिती पुढच्या आठवड्यात पक्षाच्या उमेदवारांबाबत निर्णय घेणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पत्रकार आणि राजकीय नेते बनलेल्या आशुतोष आणि संजय सिंह यांना दोन जागांसाठी राज्यसभेवर पाठवण्याबाबत विचार केला जात आहे. तर तिसऱ्या जागेद्वारे अरविंद केजरीवाल स्वतः राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी राज्यसभेवर जाण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केजरीवाल राज्यसभेसाठी आपकडून एका ख्यातनाम व्यावसायिकाला पाठवण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी गेल्या महिन्यांत संपर्क साधला होता. यावर राजन यांनी आपली शिकागो विद्यापीठातील पूर्णवेळ नोकरी सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचे म्हटले होते. त्याबरोबरच माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि देशाचे माजी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी देखील केजरीवाल यांचा राज्यसभेसाठीचा प्रस्ताव नाकारला होता. त्याचबरोबर इन्फोसिसचे संस्थापक एन. एम. नारायणमुर्ती, नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि उद्योगपती सुनिल मुंजाल यांच्याशी देखील त्यांनी राज्यसभेवर पाठवण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, या सर्वांनी त्यांना नकार दिला आहे. केजरीवाल यांचे सतत केंद्र सरकारशी होत असलेले वाद आणि आपच्या धोरणांमुळे या दिग्गजांना आपकडून राज्यसभेवर जाणे सोईचे वाटत नसावे असे सांगितले जात आहे.

दिल्लीत राज्यसभेच्या तीन जागा आहेत. आगामी २७ जानेवारीला काँग्रेसचे सध्याचे सदस्य जनार्दन द्विवेदी, परवेज हाशमी आणि करण सिंह यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे नवे राज्यसभा सदस्य दिल्ली विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडण्यात येणार आहेत. दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीचे ६७ आणि भाजपचे ३ सदस्य आहेत.