प्रत्यक्ष काम करण्याऐवजी फक्त बडबड करत राहिल्यास बिहारसारखी अवस्था होते, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रविवारी जाहीर झालेल्या निकालांत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमावरही निशाणा साधला. आम आदमी पक्ष (आप) पक्ष स्वत:च्या ‘मन की बात’ करण्याऐवजी सामान्य माणसांच्या ‘मन की बात’ करतो. आमचे सरकार कमी बोलते आणि जास्त काम करते. मात्र, काही पक्षांचे काम कमी आणि बोलणे जास्त असते, त्यांना बिहारसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, असे केजरीवाल यांनी म्हटले. काल बिहाराच्या निकालांचे वर्णन केजरीवालांनी मोदी सरकारविरोधी कौल असे केले होते. या पराभवातून धडा घेऊन केंद्र सरकार दिल्लीच्या कारभारातील हस्तक्षेप कमी करेल, अपेक्षादेखील केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.