भारतीय जनता पक्षाला दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याच्या मुद्दय़ावरून आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याविरोधात टीकेची तोफ डागली आहे. काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न आम्ही उघड करू आणि त्याविरोधात लोकांकडे दाद मागू, असाही इशारा केजरीवाल यांनी दिला.
भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या मुद्दय़ावरून लोकांमध्ये नाराजी असली तरीही नजीब जंग यांनी तसे केल्यास भाजप त्यास मान्यता देईल. मात्र भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही तसेच काँग्रेसचे सहा आमदार अद्याप तयार झालेले नाहीत, याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले. नायब राज्यपाल आपली खुर्ची वाचवू इच्छितात की घटना, अशी विचारणा करून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव भाजपने एकदा मानलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यपाल पुन्हा विद्यमान विधानसभेत त्याच पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण कसे देऊ शकतात, भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची यादी राज्यपालांनी कशी मागविली नाही, अशा अनेकविध प्रश्नांची सरबत्ती केजरीवाल यांनी केली. राज्यपालांच्या एकूण वर्तनावरून त्यांचे वर्तन पक्षपाती वाटत नाही काय, असे केजरीवाल यांनी ट्विट केले. जंग यांनी भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिसल्यास जंग यांच्याकडून घोडेबाजारास उत्तेजन दिल्यासारखे होईल काय, अशीही विचारणा केजरीवाल यांनी केली. जंग यांच्यासमवेत भेटीची वेळ आपण मागितली परंतु आपल्याला पुढील सोमवारीच ते शक्य होईल, असे उत्तर मिळाले, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
‘सत्तास्थापनेबाबत पक्षाध्यक्षांनाच विचारा’
स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजपकडून अन्य पक्षांच्या आमदारांना प्रलोभने देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप भाजपने गुरुवारी फेटाळून लावला आह़े  भाजपने कधीही अशा प्रकारचा घोडेबाजार केला नाही आणि करणारही नाही, असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी निक्षून सांगितले आह़े भाजपवरील आरोप फेटाळून लावताना राजनाथ यांनी दिल्लीतील सत्तास्थापनेबाबत मात्र प्रतिक्रिया देण्याचे टाळल़े  दिल्लीत भाजप लवकरच सत्ता स्थापन करणार का, या प्रश्नावर आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगितल़े  याबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विचारा, तेच सांगू शकतील, असेही राजनाथ म्हणाल़े दिल्लीतील सत्तास्थापनेबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत का, या प्रश्नालाही त्यांनी नकारात्मक उत्तर दिल़े  दिल्लीचे माजी अर्थमंत्री जगदीश मुखी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आह़े