28 September 2020

News Flash

“अभी तो शीला हारी है, अब मोदी की बारी है”

जनलोकपाल विधेयकच्या मुद्यावरून 'आम आदमी पक्षा'ने दिल्लीच्या सत्तेचा त्याग केल्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

| February 14, 2014 08:09 am

जनलोकपाल विधेयकच्या मुद्यावरून ‘आम आदमी पक्षा’ने दिल्लीच्या सत्तेचा त्याग केल्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ‘आप’च्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपने केली आहे. तर दुसरीकडे आगामी लोकसभा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी ‘आम आदमी पक्ष’ कामाला लागला आहे. ‘आम आदमी पक्षा’ने ४९ दिवसांच्या राजवटीत घेतलेले लोकप्रिय निर्णय आणि मुकेश अंबांनी यांचे गैरव्यवहार आपच्या आगामी प्रचाराचे मुख्य मुद्दे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच “अभी तो शीला हारी है, अब मोदी की बारी है”, च्या घोषणा देत ‘आप’ समर्थक नव्या उत्साहाने कामाला लागले आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल हेच ‘आम आदमी पक्षा’चे नेतृत्व करणार असल्याची माहिती ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.
जनलोकपालच्या मुद्यावरून अखेर सत्तात्यागाचा मुहूर्त साधला!

* ४९ दिवसांत ‘आप’ल्याच सरकारवर झाडू
* ४२ मतांनी जनलोकपाल  प्रस्ताव नामंजूर
ज्यासाठी सत्तास्थापनेचा अट्टहास केला ते जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत सादर होऊ न शकल्याने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांचे बहुचर्चित जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडण्याचा प्रस्ताव २७ विरुद्ध ४२ मतांनी फेटाळण्यात आला. या मतदानात भाजप, काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. नैसर्गिक वायूच्या दरवाढीवरून रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविल्यानेच भाजप आणि काँग्रेसने हे विधेयक रोखल्याचा आरोप केजरीवाल यांनी नंतर केला.
दिल्ली विधानसभेचे अधिवेशन खुल्या मैदानात घेण्याचा आग्रह धरणाऱ्या केजरीवाल यांना नायब राज्यपाल नजीब जंग यांनी ‘समज’ दिली होती. याशिवाय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय जनलोकपाल विधेयक विधानसभेत न मांडण्याची सूचना केली होती. ही सूचना धुडकावून केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडले. हा प्रकार घटनाबाह्य़ असल्याचे सांगत भाजप व काँग्रेसने विधेयक सादर करण्यास विरोध केला. मतदानानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
नायब राज्यपालांनी मनाई केल्यानंतरही विधेयक सभागृहात मांडण्याची परवानगी देणारे विधानसभा अध्यक्ष मनिंदरसिंह धीर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी केली. ते म्हणाले की, विधानसभेच्या चार दिवसांच्या कामकाजात जनलोकपाल विधेयकाचा उल्लेख नाही. शिवाय विधेयक आणण्याची परवानगी नायब राज्यपालांकडून घेण्यात आलेली नाही. तरीदेखील हे विधेयक मांडण्यात आले. हा प्रकार घटनाबाह्य़ आहे.
मतदानानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की, विधानसभा लोकशाहीचे मंदिर आहे. मी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला. तेथे कोठेही लिहिले नाही की, जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी हवी.  केंद्राकडे परवानगी मागितली असती तर ती कधीच मिळाली नसती; याची खात्री भाजप व काँग्रेसला असल्याने ते एकत्र आले आहेत. आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही सरकार नव्हे देशाला वाचविण्यासाठी कटीबद्ध आहोत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी हजारदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पणाला लावण्यास मी तयार आहे.

समान मुद्दय़ावर काँग्रेस आणि भाजप एकत्र येतात तर! मग देशाचा विकास हा तो मुद्दा असता तर ‘आप’ उगवलाच नसता!
ते आले, ते खोकले, ते गेले.. दिल्ली मात्र अधिकच दिशाहीन झाली.
(सोशल मीडियावर सामान्यांच्या प्रतिक्रिया)

जाणे नक्की होतेच..
काँग्रेस आणि आप यांचे सरकार दीर्घ काळ राहणार नाही, हा अंदाज सर्वानाच होता, पण हा ‘घरोबा’ कधी संपतो, याचा मुहूर्त माहीत नव्हता. प्रत्येक मुख्यमंत्री सत्तेत टिकून राहण्याची सबब शोधत असतोच केजरीवाल मात्र सत्ता सोडायचीच संधी शोधत होते, असे एका विश्लेषकाने म्हटले आहे. काँग्रेसचाच पाठिंबा घेऊन काँग्रेसविरुद्ध प्रत्येक पाऊल टाकण्याच्या केजरीवाल यांच्या खेळीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही संतप्त होते. काँग्रेस आपला पाठिंबा काढून घेईल आणि पुन्हा जनतेकडे जाता येईल, असा केजरीवाल यांचा होरा होता.

पुन्हा निवडणुकाच?
केजरीवाल यांनी नायब राज्यपालांकडे राजीनाम्याचे पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, ‘दिल्ली  मंत्रिमंडळानेच सामूहिक राजीनामा दिला असून विधानसभा बरखास्त करून तात्काळ निवडणुका घ्याव्यात, अशी आमची शिफारस आहे.’ भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री म्हणून निवडणूक प्रचारात पुढे केले गेलेले हर्षवर्धन यांनीही नव्याने निवडणुकांचीच मागणी केली आहे. आत्ताच्या संख्येच्या गणितात आम्ही सत्ता स्थापनेसाठी दावा करू इच्छित नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे आता दिल्लीत निवडणुका घेणे भाग पडणार आहे.
आम्ही रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपने आप सरकारविरोधात हातात हात घातले. त्यामुळेच जनलोकपाल विधेयक आज संमत होऊ शकले नाही. अंबानी म्हणतात की काँग्रेस तर त्यांचं दुकान आहे. नरेंद्र मोदी देशभर एवढय़ा जंगी सभा घेत आहेत. त्यांना पैसा तरी कोण पुरवतो? आता दिल्ली विधानसभा बरखास्त झाली पाहिजे आणि नव्याने निवडणुका घेतल्या पाहिजेत. आम्ही गेल्या ४५ दिवसांत जेवढा भ्रष्टाचाराचा निपटारा केला तेवढा गेल्या ६० वर्षांत काँग्रेस आणि भाजपनेही केला नाही. या दोन्ही पक्षांना भ्रष्टाचार हवा आहे. आता जनताच त्यांना चांगलाच धडा शिकवील.
अरविंद केजरीवाल, कार्यकर्त्यांसमोर शुक्रवारी केलेल्या भाषणात

राजीनाम्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. गेल्या ४९ दिवसांत त्यांना काहीही करता आले नाही. जी १८ वचने त्यांनी दिली होती, त्यातले एकदेखील पूर्ण करता आले नाही. सरकार म्हणून ते निष्प्रभच ठरले होते.
– हर्षवर्धन, भाजप नेते

केजरीवाल हा मुळात एक अत्यंत नकारात्मक विचाराचा माणूस ज्याने आयुष्यात गांभीर्याने कधीच काही केले नाही आणि सुरुवातीपासून अखेपर्यंत निव्वळ नाटकबाजीच केली. सरकार चालविण्याबाबत ते कधीच गंभीर
नव्हते आणि सत्ता सोडायची संधीच शोधत होते.
– संदीप दीक्षित, काँग्रेस प्रवक्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 8:09 am

Web Title: kejriwal left delhis cm position
टॅग Jan Lokpal Bill
Next Stories
1 बलात्काराला विरोध करणाऱ्या दलित महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
2 तेलंगण विधेयकावरून लोकसभेत रणकंदन
3 स्वसंरक्षणासाठी मिरपूड फवारली-राजगोपाल
Just Now!
X