आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने परकीय गुंतवणूकीच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीसुद्धा हरियाणातील भूसंपादनाच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांनी शेतकरी वर्गाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. आपणसुद्धा व्यापारी कुटुंबातून आल्याचे सांगत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील व्यापा-यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
मीसुद्धा व्यापाराची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलो आहे. माझे बहुतेक नातेवाईक व्यापारी आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता व्यापार करणे ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही. व्यापार करताना तुमच्यामागे सतत पैशांसाठी अनेकांचा तगादा लागलेला असतो. व्यापारी वर्गाच्या स्थितीची आपल्याला पूर्णपणे जाणीव असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या मागील विधानसभा निवडणुकांनंतर सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला देण्यात आलेली मान्यता रद्द केली होती.