ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे निकटवर्तीय आणि टीम अण्णाचे माजी सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर आता अण्णा हजारे यांनीच तोफ डागली आह़े  केजरीवाल यांचा ‘आम आदमी पक्ष’सुद्धा  ‘सत्तेतून पैसा’ आणि ‘पैशातून सत्ता’ या इतर राजकीय पक्षांच्या मार्गानेच जात असल्याचा आरोप करीत, अण्णा हजारे यांनी आपण या पक्षाला मतदान करणार नसल्याचे सांगितल़े  तसेच केजरीवाल यांना सत्तेचे आकर्षण असल्याची टीकाही त्यांनी केली़
एका खासगी वृत्तवाहिनीवरील दोन दिवसीय कार्यक्रमाच्या एका सत्रात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होत़े  तुमचा आधीचा सहकारी सत्तेचा लोभी बनला आहे का, या प्रश्नाला ‘हो’ असे उत्तर देत हजारे यांनी केजरीवाल यांच्या पक्षावर शरसंधान करण्यास सुरुवात केली़  त्यांच्या पक्षाला मत देण्याचा माझा यापूर्वी विचार होता़  परंतु, त्यांची वाटचाल आता सत्ता आणि पैशाच्या राजकारणाकडे होऊ लागल्याने आपण त्यांच्या जवळपासही राहणार नसल्याचे अण्णा हजारे यांनी या वेळी स्पष्ट केल़े. राजकारणाच्या आखाडय़ात प्रामाणिक उमेदवार उतरविल्यास आपण केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा देऊ आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याविरोधात केजरीवाल यांनी लढा दिल्यास केजरीवाल यांच्यासाठी प्रचारही करू, असे अण्णा यांनी पूर्वी सांगितले होत़े  परंतु, केजरीवाल यांच्या पक्षाची वाटचाल सुरू होताच, हजारे यांनी त्यांच्यापासून फारकत घेण्यास सुरुवात केली आह़े  केजरीवाल निस्वार्थी सेवा करण्यासाठी चळवळीत आले आहेत, अशी यापूर्वी माझी समजूत होती़  परंतु, राजकारणात उतरण्याचा विचार त्याच्या मनात आलाच कसा आला, हे मात्र मला कळेनासे झाल्याचे ते म्हणाले.    

केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षा’ला मतदानही करणार नाही. त्यांची वाटचाल सत्ता आणि पैशाच्या दिशेने सुरू आहे.