दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठीच्या रांगेत ४५ व्या क्रमांकावर असलेले केजरीवाल तब्बत सहा तास तेथे थांबले होते. पुढील पाच वर्षांचा प्रवास आता सुरू झाला आहे, भ्रष्टाचार संपुष्टात आणून दिल्लीचा विकास करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण रांगेत उभे होतो, असेही केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक जण इच्छुक होते, आपला ४५ वा क्रमांक होता, असेही त्यांनी ट्वीट केले आहे. केजरीवाल हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, मात्र त्यांच्या रोड-शोला विलंब झाल्याने त्यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला.

आप आमदाराचा राजीनामा आपचे आमदार सुरेंद्र सिंह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. तोमर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्लीचे माजी मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांच्याऐवजी त्यांची पत्नी प्रीती तोमर यांना ‘आप’ने त्रिनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

अमरिंदर यांचे शिरोमणी अकाली दलाला आव्हान

चंडीगड : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत  भूमिका बदलावी अशी सूचना भाजपने केल्यानंतर शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) दिल्ली विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, त्यावरून पंजाबजे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी, हिंमत असेल तर केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडावे, असे आव्हान एसएडीला दिले आहे. अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. गांधी कुटुंबाला खुश करून खुर्ची टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड  दिसून येते, असे बादल म्हणाले.