दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी लोकसभा निवडणूक लढावी, अशी विनंती केली आहे. नोएडा येथील ‘आप’च्या जन अधिकार यात्राच्या समारोपाच्या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही विनंती केली. मात्र, सिन्हा यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यावर केजरीवाल यांनी काहीही भाष्य केले नाही.

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित पदयात्रेच्या समारोप प्रसंगी येथे ‘जन अधिकार’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची उपस्थिती होती. यावेळी सभेला संबोधित करत असताना केजरीवाल म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे, पण तुम्ही मला सांगा जर तुमच्या सारखी चांगली माणसं निवडणूक लढवणार नाहीत, तर मग कोण लढवणार? असा सवाल त्यांनी सिन्हा यांना विचारला. त्यानंतर उपस्थित जनतेला त्यांनी सिन्हा यांनी निवडणूक लढवावी की नाही असा प्रश्न विचारला. जनतेकडून हो उत्तर आलं आणि केजरीवाल यांनी सिन्हा यांना थेट निवडणूक लढवण्याची विनंती केली. केजरीवाल यांच्या या विनंतीवर यशवंत सिन्हा यांच्याकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर अनेकदा टीका केली आहे. या सभेमध्ये त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.