भारतीय उद्योग संघाच्या (सीआयआय) सोमवारी झालेल्या बैठकीत ‘आम आदमी पक्षा’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा एकदा ‘आप’ची सत्ता येईल, असा आशावाद व्यक्त केला. आपण भांडवलशाहीचे विरोधक नसून भांडवलशहा ज्याप्रकारे कंपूशाहीचे राजकारण करतात, त्याला आपला विरोध असल्याचे अरविंद केजरीवालांनी यावेळी सांगितले. देशातील उदयोगपतींनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी ‘आप’ सरकारला सूचना कराव्यात, असे आवाहन केजरीवालांनी केले. आजवरच्या आमच्या कारभारात चुका झाल्या असतील, आमच्या धोरणांची दिशा चुकलीही असेल परंतु; आमचा हेतू मात्र शुद्ध असल्याचे केजरीवालांनी सीआयआयच्या बैठकीदरम्यान स्पष्ट केले. तसेच आगामी काळात भ्रष्टाचार रोखण्यात यश आल्यास उद्योगांसाठी लागणा-या खर्चात कपात होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल असे केजरीवालांनी सांगितले.