करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण करावे लागणार असून त्यासाठी सामूहिक लसीकरण हाच योग्य पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ४५ वर्षांची अट काढून टाकली पाहिजे तसेच, बिगर आरोग्यकेंद्रांवरही लसीकरणाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असली तरी टाळेबंदीची शक्यता मात्र केजरीवाल यांनी फेटाळली.

देशभर करोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जात असून केंद्र सरकारनेही राज्यांना लसीकरणाला वेग देण्याची तसेच  मध्यमवयीन व्यक्तींच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे. शिवाय, सर्वाधिक करोनाबाधित जिल्ह्याापार्श्वत दोन आठवड्यांमध्ये ७५ टक्के लोकांचे लसीकरण करण्याचाही सल्ला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी सामूहिक लसीकरणाची मागणी केली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांचा लसीकरणासाठी समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, तरुण व मध्यमवयीन लोकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे आढळल्याने ४५ वर्षांची अट शिथिल करून सर्व वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले तर करोना आटोक्यात आणता येईल, असा युक्तिवाद केजरीवाल यांनी केला.

वेगाने लसीकरण करायचे असेल तर फक्त रुग्णालये वा आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहता येणार नाही. समाजकेंद्रांसारख्या बिगर आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची यंत्रणा उभी करून त्या त्या भागांतील लोकांचे लसीकरण त्वरित करता येऊ  शकेल, अशी सूचना केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.

देशभर गेले तीन महिने लसीकरणाची प्रक्रिया राबवली जात असून लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. बिगर आरोग्यकेंद्रांवर रुग्णवाहिका, देखरेख यंत्रणा तैनात करता येईल. दिल्लीत शुक्रवारी ७१ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी दोन-तीन जणांना किंचित त्रास झाला पण, दोन तासांत त्यांची प्रकृती ठीक झाली. हे पाहता लसीकरणाची व्यापक मोहीम आखण्यास केंद्राने परवानगी दिली पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.

चौथी लाट पण,  टाळेबंदी नाही!

दिल्लीत गेल्या आठवड्याभरापासून करोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत असून गुरुवारी दिवसभरात साडेतीन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली. दिल्लीतील ही चौथी लाट असून आधीच्या लाटांपेक्षा ही लाट कमी धोकादायक असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. गेल्या ऑक्टोबरमध्ये दैनंदिन वाढ सुमारे तीन हजार होत होती, त्यापैकी १५०० रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागत होते, आत्ता हे प्रमाण ८०० रुग्ण इतके म्हणजे निम्म्याने कमी आहे. दैनंदिन मृत्यूही सुमारे ४० होत होते, आता हे प्रमाण १० इतके आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. रुग्णसंख्या वाढत असली तरी राज्य प्रशासन सतर्क आहे. आतातरी दिल्लीमध्ये टाळेबंदी लागू केली जाणार नाही, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

 

केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी बैठक घेऊन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व खासगी तसेच, सरकारी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील खाटांची उपलब्धता गरजेनुसार वाढवण्यासाठी आराखडा निश्चित केला.