दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध बदनामीच्या खटल्यात समन्स जारी करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात दिल्लीतील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी केजरीवाल यांच्याविरुद्ध आरोपी म्हणून समन्स बजावण्यात आले.
आम आदमी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्याही नावाचा उल्लेख आहे. याच आरोपावरून गडकरी यांनी याचिका दाखल केली होती. दिल्लीतील महानगर न्यायदंडाधिकारी गोमती मनोचा यांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध समन्स जारी केला असून, ७ एप्रिलला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गडकरी यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतून त्यांच्याविरोधात केजरीवाल यांनी खोटे आरोप केल्याचा युक्तिवाद गडकरी यांचे वकील पिंकी आनंद आणि अजय दिगपॉल यांनी न्यायालयात केला.