मेट्रो स्टेशन. शेजारीच नवी दिल्ली रेल्वे स्टेशन. दोन्ही स्टेशन्स कायम गजबजलेली. नजीकच्या रामलीला मैदानावर काहीही कार्यक्रम असला, की सामान्य प्रवाशांची गैरसोय होणारच. बरं कुणाच्या समर्थकांना काय बोलण्याची सोय नाही. तुमच्यासाठीच आंदोलन करतोय ना, असं उर्मटपणे प्रवाशांनाच ऐकवलं जायचं. अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीच्या कानाकोपऱ्यातून नवी दिल्ली मेट्रो स्टेशनवर साडेनऊ वाजता प्रवाशांची झुंबड उडाली होती. मागच्या वेळी गोंधळामुळे रेटारेटी, कुणाच्या मौल्यवान वस्तू हरवणं, तर स्टेशनमधून बाहेर पडताना मशीनच बंद पडलं होतं. यंदाही तसेच होण्याची भीती होती. प्रत्येक समर्थकाच्या डोक्यावर ‘आम आदमी’चं ‘जंतर-मंतर’ होतं. आंदोलनाचा बाज ओसरला नव्हता; पण त्याला शिस्तीची जोड होती. गळ्यात पिवळ्या रंगाचा गमछा गुंडाळलेले शेकडो स्वयंसेवक शपथविधीला न जाता मेट्रो स्टेशनच्या बाहेर आपापली जबाबदारी पार पाडत गर्दीचे नियोजन करीत होते.
दहा-पंधरा जणांचा समूह, हातात-हात घालून गालावर तिरंगा रेखाटून काही जोडपी व्हॅलेंटाइन साजरा करण्यासाठी रामलीलाच्या दिशेने सरकत होते. आबालवृद्धांचा उत्साह दांडगा होता. ‘पाँच साल – केजरीवाल’च्या घोषणेने पुढचा टप्पा गाठला होता. ‘बदलेगा दिल्ली का हाल – पाँच साल केजरीवाल’ची घोषणा निनादत होती. अभूतपूर्व उत्साह दिल्लीकरांमध्ये दिसत होता. रामलीला मैदानावर पाय ठेवायलादेखील जागा नव्हती. ‘मेणबत्ती संपद्राय’ राजकीय पक्षाचा समर्थक झाला होता. ‘आम आदमी’च्या टोपीची किंमत दहा रुपये, तिरंगा दोनशे, तर गालावर देशभक्तीची रंगरेषा रेखाटण्याचे वीस रुपये मोजून अनेक जण देशभक्ती साजरी करीत होते.
कार्यक्रम संपल्यावर केजरीवाल यांचे भाषण झाले. टाळ्या-घोषणा नि पुन्हा उत्साह! केजरीवाल यांचे भाषण संपले. त्यांच्यासह मंत्रिमंडळ सचिवालयाच्या दिशेने निघाले. इकडे रामलीलावर गर्दीचा बहर ओसरत नव्हता. प्रसारमाध्यमांचे लखलखते कॅमेरे गर्दीच्या दिशेने सरसावले.
लोक जाण्यास तयारच नव्हते. स्वयंसेवकांची चिंता वाढत होती. गळ्यात भगवा गमछा घालून मैदानात नियोजन करणारे स्वयंसेवक अखेरीस प्रसारमाध्यमांनाच विनवू लागले. कृपया आता थांबवा; त्याशिवाय लोक जाणार नाहीत! पण हौशे-नवशे ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कॅमेरा फिरताना त्यात आपण टिपले गेलो, याचे समाधान होईस्तोवर ‘रामलीला’वरची ‘आप’सेना हलली नाही.

कार्यकर्त्यांचा उत्साह
परिवर्तनाचा उत्साह नि केजरीवाल यांना ऐकण्याची उत्सुकता प्रत्येक घोषणेत दिसत होती. मैदानात केजरीवाल पोहोचताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. सूर्य डोक्यावर आल्याने चटका बसू लागला होता; पण गर्दीचा उत्साह कायम होता. शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रत्येक मंत्र्याचे समर्थक घोषणाबाजी करीत होते.