करोनामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. आशातच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे राज्य सरकार केंद्राकडे मागणी करत आहेत. दिल्ली सरकारने केंद्राकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. दरम्यान, केंद्राने 730 टन ऑक्सिजन पुरवठा केला आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून पहिल्यांदाच दिल्लीला 700 टन पेक्षा जास्त ऑक्सिजन दिल्याबद्दल आभार मानले. यासह केजरीवाल यांनी दिल्लीला दररोज ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली. तसेच हात जोडून सर्वांना विनंती करतो की पुरवठा कमी करु नका, असं केजरीवाल म्हणाले. 

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, “दिल्लीला दररोज 700 टन ऑक्सिजन लागतो. आम्ही केंद्र सरकारकडे सतत मागणी करत होतो की आम्हाला ऑक्सिजन द्या. काल पहिल्यांदाच दिल्लीला 730 टन ऑक्सिजन मिळाला आहे. मी दिल्लीतील जनतेच्या वतीने आपले आभार मानतो. दररोज किमान इतका ऑक्सिजन पुरवठा दिल्लीला करावा, अशी आपणास विनंती आहे. संपूर्ण दिल्ली आपली यासाठी आभारी आहे.”

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी ऑक्सिजनमुळे निर्माण झालेल्या संकटावर सुनावणी पार पडली. दिल्लीतील 50 हून अधिक मोठ्या रुग्णालयांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांच्याकडे पुरेसा ऑक्सिजनसाठा उपलब्ध असल्याचं केंद्राने सांगितलं. दरम्यान दिल्लीला दररोज 700 टन ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य नसल्याचं केंद्राने म्हटलं आहे. न्यायालयाने दिल्लीला इतका ऑक्सिजन पुरवठा करावा लागेल, असं बजावलं असता जर दिल्लीला दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला तर इतर राज्यांमध्ये कमतरता भासेल, असं केंद्राने म्हटलं होतं.