केंद्रात प्रचंड बहुमताच्या जोरावर सत्तेत असलेल्या भाजपची धूळधाण करीत दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवा इतिहास रचणाऱ्या आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीपूर्वीच राज्यातील नोकरशाही कामाला लागली आहे.
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करण्याचे आदेश मुख्य सचिव दीपक सपोलिया यांनी संबधित विभागांना दिले आहेत. त्यात प्रामुख्याने वीज दरात कपात, पाणीपुरवठा, सीसीटीव्ही बसवणे व दोन लाख सार्वजनिक शौचालये उभारण्याच्या आश्वासनांचा समावेश आहे.
सपोलिया यांनी संबधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘आप’ने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती मागवली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांच्यासमोर प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी विस्तृत सादरीकरण करतील. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनीदेखील हीच पद्धत अवलंबली होती. यापूर्वी शपथविधीला मेट्रोने येणाऱ्या केजरीवाल यांनी मागील अनुभवांवरून धडा घेतला आहे. शपथविधीसाठी मेट्रोने प्रवास केल्यास सामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय, प्रशासनावर येणारा ताण व सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न -यामुळे केजरीवाल यंदा रामलीला मैदानावर वाहनाने दाखल होणार आहेत. बरोबर वर्षभरापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे केजरीवाल लक्षावधी समर्थकांच्या साक्षीने शनिवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया व अन्य चार नव्या चेहऱ्यांचा शपथविधी होईल. शपथविधी सोहळ्यास आम आदमी पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण धाडण्यात आले होते. अन्य केंद्रीय मंत्र्यांना मात्र केजरीवाल यांनी थेट निमंत्रण दिलेले नाही. हा ‘आम आदमी’चा शपथविधी असल्याने कुणीही या सोहळ्यास उपस्थित राहू शकतो, अशी भूमिका ‘आप’ने घेतली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात कुणीही ‘व्हीआयपी’ नसेल. भाजपच्या तीन आमदारानां या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भाजपकडून कुणीही या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचा दावा प्रदेश भाजपच्या सूत्रांनी केला. भाजपच्या सातही खासदारांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.