काँग्रेस आणि भाजप या बडय़ा पक्षांना बाजूला सारून दिल्ली सर करणाऱ्या ‘आम आदमी पक्षा’चे नेते अरविंद केजरीवाल शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ऐतिहासिक रामलीला मैदानावर केजरीवाल यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार असून, त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहा मंत्रीही या वेळी शपथ घेतील. सर्वसामान्यांचे नेते असा गौरव प्राप्त झालेल्या केजरीवाल यांच्या शपथविधीला शेकडो नागरिक उपस्थित राहण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुपारी दोन वाजता केजरीवाल तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्याच्या प्रश्नांचा आढावा घेतील. त्यानंतर ते राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करतील, अशी माहिती ‘आप’च्या वतीने देण्यात आली.
दिल्लीतील ऑटोरिक्शा चालकांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी केजरीवाल यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली आहे. शुक्रवारी रिक्षाचालकांच्या संघटनेने केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांविषयी माहिती दिली. केजरीवाल शनिवारी कौशंबी येथून बाराखंबापर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत. त्यानंतर रामलीला मैदानावर ते आपल्या कारने जातील, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली. शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहणार नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
आमदार ‘मेट्रो’ने येणार
दिल्लीतील व्हीआयपी संस्कृती हद्दपार करण्याचे आम आदमी पार्टीने ठरविले असल्यानेच शनिवारी रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधीसाठी पक्षाच्या आमदारांनी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला असल्याचे आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी येथे सांगितले.