भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी येथून निवडणूक लढविण्यास आपण केव्हाही तयार आहोत. परंतु, याबाबतचा निर्णय वाराणसीतील लोकांनी घ्यायचा आहे. २३ मार्च रोजी आम आदमी पार्टीची रॅली वाराणसीमध्ये होणार असून, त्यानंतर तेथील लोकांचा कौल घेऊनच मोदी यांच्या विरोधात आपण निवडणूक लढविण्याबाबत निर्णय घेऊ, असे ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी येथे एका रॅलीतील भाषणात स्पष्ट केले.
‘मोदी यांच्या विरोधात मी निवडणूक लढवावी अशी आम आदमी पार्टीची इच्छा आहे. मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हान पेलण्यास मी तयार आहे. परंतु, २३ मार्च रोजी वाराणसी येथे  रॅली काढून तेथील लोकांचा प्रतिसाद मिळाला तरच आपण मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊ,’ असे केजरीवाल यांनी सांगितले.’
‘वाराणसीत जाऊन रॅली काढू, त्यात लोकांची साथ लाभली आणि वाराणसीच्या लोकांचे मत लक्षात घेऊन त्यांनी माझ्यावर मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची जबाबदारी सोपली तरच आपण निवडणूक लढविणार आहोत, असे केजरीवाल यांनी नमूद केले. परंतु, आजघडीला वाराणसी येथून निवडणूक लढविण्याचे आपण ठरवू शकत नाही. पक्ष मला वाराणसी येथून उमेदवारी देण्यास तयार आहे. परंतु, पक्षाने तयारी दर्शविण्यापेक्षाही वाराणसीमधील स्थानिक लोकांचा कौल घेणे मला महत्त्वाचे वाटते. त्यामुळे लोकांनी पाठिंबा दिला तरच नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आपण निवडणूक लढवू,’ असे केजरीवाल म्हणाले. दरम्यान, वाराणसीबरोबरच गुजरातमधील एक जागा अशा दोन ठिकाणांहून मोदी निवडणूक लढविणार असल्याचे समजते. त्याबाबत टीका करताना केजरीवाल म्हणाले की, सुरक्षितपणे, सहजपणे निवडून येण्यासाठी मोदी सुरक्षित लोकसभा मतदारसंघ शोधत आहेत. ‘मित्रांनो, अशा प्रकारे एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढविण्याचे मोदी यांनी ठरविले तर ते फक्त गुजरातचे नेते ठरतील आणि देशाचे पंतप्रधान म्हणवून घेण्यास ते अपात्र आहेत असेच म्हणावे लागेल’, असे सांगून केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली.