आम आदमी पार्टीने (आप) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर रिलायन्सच्या गॅस दरावरून पुन्हा एकदा तोफ डागली आहे. आपण सत्तेवर आल्यास गॅसचे दर कमी करणार का, असा सवालच आपने एका पत्राद्वारे मोदी यांना केला आहे.
भाजपचा निवडणूक खर्च आणि पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी निधी उपलब्ध करणाऱ्या व्यक्ती यांची माहिती जाहीर करावी, असेही दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आपण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात, असे असताना या प्रश्नावर गप्प का, आपल्या पक्षाचे सरकार स्थापन झाले, आपण पंतप्रधान झालात तर गॅसचे दर आठ डॉलरवरून चार डॉलरवर आणणार का, हे सर्वसामान्य जनतेला जाणून घ्यावयाचे आहे, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी सदर पत्र वाचून दाखविले.
भाजपच नव्हे तर काँग्रेसही या प्रश्नावर गप्प आहे, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्यानेच हे पक्ष गप्प आहेत का, असा सवालही केजरीवाल यांनी केला. मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे समूह अध्यक्ष परिमल नाथवानी अलीकडेच आपल्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून आल्यामुळेच संशय बळावलो, असेही केजरीवाल म्हणाले.
केंद्रातील यूपीए सरकार अंबानी चालवितात, असा आरोप केजरीवाल यांनी केला. मोदी सत्तेवर आल्यास त्यांचे सरकारही अंबानीच चालविणार का, असा सवालही त्यांनी केला. स्विस बँकेतून काळा पैसा आणण्यात येईल, असे आपण भाषणांमधून सांगत आला आहात, अंबानी बंधूंचा पैसाही या बँकेत आहे, त्यामुळे त्यांचा पैसाही परत आणणार का, असा सवालही त्यांनी केला.