अहमदाबाद : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबाद येथे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्यांचा मोठा रोड शो होणार आहे.

साबरमती आश्रमाची सफर त्यांना घडवली जाणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन ते पंतप्रधान मोदी यांच्या समवेत करणार आहेत. याच स्टेडियमवर ह्यूस्टनमधील ‘हाउडी मोदी’ मेळाव्याच्या धर्तीवर ‘केम छो ट्रम्प’ मेळावा (हाउडी ट्रम्प) घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास लाखो लोकांची उपस्थिती राहणार आहे.

२४ फेब्रुवारीला ट्रम्प हे अहमदाबादला येणार असून मोदी त्यांच्या राज्यात अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचा खास पाहुणचार करणार आहेत. अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रम या दहा कि.मीच्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा रोडशो होणार असून यावेळी लाखो भारतीय दुतर्फा त्यांच्या स्वागतास सज्ज असतील.

अमेरिकी अध्यक्ष विमानतळावरून आल्यानंतर साबरमती आश्रमास भेट देणार असून महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेला हा आश्रम स्वातंत्र्य लढय़ाचे प्रमुख केंद्र होता. ट्रम्प व मोदी हे नंतर मोटेरा भागात सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत. त्यावेळी तेथे लाखो भारतीयांना ट्रम्प व मोदी संबोधित करतील. हा कार्यक्रम ‘हाउडी मोदी’च्या धर्तीवर आहे. हाउडी मोदी हा कार्यक्रम ह्य़ूस्टनमध्ये झाला होता. त्यावेळी पन्नास हजाराहून अधिक भारतीय अमेरिकी लोक उपस्थित होते. मोदी व ट्रम्प हे ‘हाउडी मोदी’ मेळाव्यात एकत्र आले होते. तसाच कार्यक्रम पटेल नवीन स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. आता गुजरातमध्ये होणारा मेळावा हा ‘हाउडी ट्रम्प’ म्हणजे ‘केम छो ट्रम्प’ नावाने ओळखला जाणार आहे. मोटेरा येथील पटेल स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १.१० लाख म्हणजे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमपेक्षा मोठी आहे.

अहमदाबाद महापालिकेने याबाबत अधिकाऱ्यांना रोड शोच्या तयारीसाठी कामे ठरवून दिली आहेत. मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रित केले आहे त्यांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय करण्याचा आदेश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

ट्रम्प हे अहमदाबादेत येत असल्याने गुजरात विधानसभेत २६ फेब्रुवारीला मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाची तारीख बदलण्यात येत आहे.

‘ट्रम्प यांच्या नियोजित भारत दौऱ्यामुळे आनंद’

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या समवेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याबाबत  पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केलाअसून ट्रम्प यांचे संस्मरणीय स्वागत करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, भारत व अमेरिका यांच्यात लोकशाही व विविधतेसाठी वचनबद्धता असून आमचे देश अनेक विषयांवर एकमेकांशी सहकार्य करीत आहेत. दोन्ही देशातील भक्कम मैत्री आमच्या नागरिकांनाच नव्हे तर जगाला लाभदायी आहे. ट्रम्प यांची ही भेट विशेष असून भारत-अमेरिका मैत्री संबंधांवर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ट्रम्प व मोदी यांच्यात आठवडाअखेरीस दूरध्वनी संभाषण झाले असून त्यात त्यांनी दोन्ही देशातील मैत्री वृद्धिंगत करण्याचा निर्धार केला आहे. भारत व अमेरिका या देशातील लोकांमध्ये एक मजबूत बंध असून धोरणात्मक भागीदारी वाढवली जाईल, असे ग्रिश्ॉम यांनी म्हटले आहे.