अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे. व्हाइट हाऊसकडून शुक्रवारी उशिरा यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. भारतासोबत आर्थिक, व्यापारी आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून ते वाढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे, हेच या निर्णयावरून दिसून येते आहे.

केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेन पराराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात. रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यातच राजीनामा दिला होता, त्यानंतर भारतातील नवे अमेरिकन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी केनेथ जस्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ६२ वर्षांचे केनेथ जस्टर हे आता अमेरिकेचे भारतातील राजदूत असतील.

केनेथ जस्टर यांनी जानेवारी ते जून या कालावधीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक विषयांचे उप सल्लागार म्हणूनही काम केले आहे. केनेथ जस्टर यांच्याजवळ हॉर्वर्ड लॉ स्कूलमधील कायद्याची पदवी आहे. याशिवाय हॉर्वर्डमधील जॉन एफ केनेडी स्कूलमधून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर पदवी घेतली. हॉर्वर्ड कॉलेजमधील बॅचलर डिग्रीही आहे.

केनेथ जस्टर २००१ ते २००५ पर्यंत अंडर सेक्रेटरी ऑफ कॉमर्स होते. १९९२-१९९३ या दरम्यान स्टेट डिपार्टमेंटमध्ये अॅक्टिंग काऊन्सिलर राहिले आहेत. याशिवाय १९८९ ते १९९२ पर्यंत  डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आता ते अमेरिकेचे भारतातील राजदूत असणार आहेत.