केनियाची राजधानी असलेल्या नैरोबीत पावसाने १४ जणांचा बळी घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे सहामजली इमारत कोसळली. त्यात सात जण गाडले जाऊन मृत्युमुखी पडले. अनेक ठिकाणी इमारती
कोसळल्या असून, ढिगाऱ्याखाली लोकांचा शोध घेतला जात आहे. एका व्यक्तीला पहाटेच्या वेळी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले.
केनियाच्या रेडक्रॉसने सांगितले, की शुक्रवारी रात्री पावसाने इमारत कोसळली, पण त्यानंतर लगेचच आकाश रात्रीच निरभ्र झाले. नैरोबीचे पोलीस प्रमुख जाफेख कुमी यांनी सांगितले, की इमारत कोसळून सात जण मरण पावले आहेत. इतर १२१ जणांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
केनियातील रेडक्रॉस व इतर मदत संस्था ढिगारे उपसण्याचे काम करीत असून, पावसाचा फटका दीडशे घरांना बसला आहे. हुरुमा येथील दोन इमारती काल धोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. इतर दोन घटनांत वाहने वाहून गेल्याने दोघांचा औद्योगिक वसाहत असलेल्या भागात मृत्यू झाला.
नैरोबीचे डेप्युटी गव्हर्नर जानाथन म्युके यांनी शनिवारी सकाळी इमारत कोसळलेल्या भागाला भेट दिली असून, दोन वर्षांपूर्वी बांधलेली इमारत का कोसळली, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारत बांधताना काही निकषांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा संशय असून पावसामुळे ही इमारत कोसळली होती.
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता इमारत कोसळली असून, या पावसाळय़ातील हा आतापर्यंतचा मोठा पाऊस होता. पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. सगळीकडे गोंधळ माजल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत, असे रेडक्रॉसच्या प्रवक्त्या अर्नोल्डा शिउनुडू यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या चित्रणात पोलीस, सैनिक, नागरिक मदतकार्यात सहभागी होताना दिसले.