केनियातील नैरोबी येथे भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केनियातील भारतीय दुतावासाकडून अहवाल मागवला आहे. बंटी शहा (वय ३२) असे या तरुणाचे नाव असून त्याचे कुटुंब व्यवसायानिमित्त नैरोबीत स्थायिक झाले आहे.

नैरोबीत राहणाऱ्या बंटी शहा या तरुणाची राहत्या घरी हत्या करण्यात आली. गेल्या आठवड्यात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मारेकऱ्यांनी बंटीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. बंटी शहाच्या कुटुंबियांनी नैरोबीत स्वतःची कंपनी सुरु केली होती. ‘बॉबमिल’ या नावाने त्यांनी गाद्यांचा कारखाना सुरु केला होता. बॉबमिल कंपनी ही केनियातील नामांकित कंपन्यांपैकी एक आहे. बंटी शहा रविवारी पहाटे घरी झोपला होता. यादरम्यान हल्लेखोरांनी घरातील मेन गेट तोडून बंटी शहाच्या खोलीत प्रवेश केला. दुचाकीवरुन हे हल्लेखोर आले होते. बंटी शहाचे वडील विपिन शहा आणि त्यांच्या कुटुंबियांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शहा कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून ते प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील या घटनेची दखल घेतली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी ट्विटरद्वारे सुषमा स्वराज यांना मदत मागितली होती. स्वराज यांनी आफ्रिकेतील भारतीय दुतावासाला मदत करण्याचे आदेश दिले. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.