पृथ्वीपासून १२०० प्रकाशवर्षे अंतरावर पाण्याची शक्यता असलेला एक ग्रह सापडला असून तो वसाहतयोग्य असू शकतो असा दावा लॉसएंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केला आहे. केप्लर ६२ एफ असे या ग्रहाचे नाव असून तो वीणा तारकासमूहात आहे. हा ग्रह अंदाजे पृथ्वीपेक्षा ४० पट मोठा आहे. केप्लर ६२ एफ या ग्रहाचा विचार करता तो खडकाळ असावा पण तेथे महासागर असावेत असे ओमावा शिल्डस यांनी म्हटले आहे. नासाच्या केप्लर मोहिमेत २०१३ मध्ये हा ग्रह शोधला गेला होता व ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पाच ग्रहांपैकी तो सर्वात शेवटचा आहे. तारा मात्र सूर्यापेक्षा लहान व तुलनेने थंड आहे. त्यावेळी त्या ग्रहाची व ताऱ्याची संरचना समजली नव्हती तसेत कक्षाकाळही माहिती नव्हता. आता त्याची जास्त माहिती मिळाली आहे. एखाद्या ग्रहावर वस्ती करता येऊ शकते की नाही हे तेथील हवामानावर अवलंबून असते. तेथे वातावरणीय स्थिती वेगळ्या असून द्रव रूपात पाणी राहू शकेल अशी परिस्थिती आहे. पृथ्वीवर कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.०४ टक्के आहे. केप्लर ६२ एफ हा ग्रह ताऱ्यापासून सूर्य व पृथ्वी यांच्या अंतरापेक्षा दूर असल्याने तेथे कार्बन डायॉक्साईड जास्त असावा व त्यामुळ उबदार वातावरणामुळे पाणी असावे व ते गोठलेले नसावे असा अंदाज आहे. संगणकीय सादृश्यीकरणातून अनेक शक्यता सामोऱ्या आल्या असून त्यातून हा ग्रह वसाहतयोग्य असावा असा अंदाज आहे कारण तेथे कार्बन डायॉक्साईडची मात्रा वेगवेगळी आहे. हा ग्रह वर्षभर वसाहतयोग्य स्थिती असावा असा अंदाज असून त्यासाठी पृथ्वीच्या तीन ते पाच पट दाट व कार्बन डायॉक्साईडचे वातावरण तेथे असावे लागेल. हा ग्रह ताऱ्यापासून दूर असल्याने तेथे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त असू शकते. ग्रहाचा कक्षीय मार्ग व त्याबाबतची गणिते केली असता तो वसाहतयोग्य असू शकतो. एचएनबॉडी या संगणकीय प्रारूपाच्या मदतीने हे प्रयोग करण्यात आले. जर्नल अ‍ॅस्ट्रोबायॉलॉजीत याबाबतचे संशोघन प्रसिद्ध झाले आहे. बाह्य़ग्रहांची वसाहतयोग्यता ठरवण्यासाठी हेच प्रारूप वापरता येईल कारण अशी कुठलीच माहिती दुर्बिणीच्या माध्यमातून मिळू शकत नाही असे श्रीमती शिल्डस यांनी सांगितले. केप्लर दुर्बिणीने शोधलेले २३०० बाह्य़ग्रह हे खरोखर ग्रह असल्याचे सिद्ध झाले आहे. इतर हजारो ग्रहांची अशी तपासण चालू आहे पण वसाहतयोग्य ग्रहांची संख्या कमी आहे.