केरळमधील किमान २१ जण बेपत्ता आहेत असे केरळच्या विधानसभेत सोमवारी सांगण्यात आले. हे सर्व जण आयसिसच्या बाजूने लढण्याकरिता गेले असल्याची चर्चा असताना सरकारने ते फक्त बेपत्ता असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री विजयन यांनी ते आयसिसकडे गेले असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यातील सतराजण कसरगोडचे तर चारजण पलक्कडचे आहेत, असे प्राथमिक माहितीत निष्पन्न झाले आहे असे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अतिरेकीवाद व दहशतवाद यांना धर्म नसतो व सरकार मुस्लीमविरोधी भावना भडकावण्याचे प्रयत्न कुणाला करू देणार नाही. कसरगोडच्या बेपत्ता लोकांमध्ये चार महिला व तीन मुलांचा समावेश आहे. तसेच पलक्कडमधील दोन महिला बेपत्ता आहेत. ते लोक विविध कारणांसाठी घर सोडून गेले आहेत. प्रसारमाध्यमातील बातम्यानुसार ते आयसिसच्या छावण्यात असून सीरिया व अफगाणिस्तानात गेले आहेत. विजयन यांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर रविवारी कसरगोड येथील फिरोज याला अटक करण्यात आली असून त्याचा या घटनाक्रमाशी संबंध आहे. सरकार या प्रश्नावर गंभीर आहे. केंद्रीय संस्थांच्या मदतीने यावर पावले उचलली जातील. दहशतवदी कारवायांवर सरकार कठोर कारवाई करील, पण मुस्लीमविरोधी भावना भडकावण्याचे प्रयत्नही यशस्वी होऊ देणार नाही. आयसिसमध्ये केरळचे तरुण मोठय़ा प्रमाणावर गेल्याच्या वृत्ताने केरळात भीतीचे वातावरण आहे असे चेन्नीथाला यांनी सांगितले, पण तशी कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही त्यामुळे सरकारने यावर स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. भाजपचे आमदार ओ राजगोपाल यांनी सांगितले की, दंतवैद्यक शाखेच्या अखेरच्या वर्षांस असलेली एक विद्यार्थिनी बेपत्ता आहे, तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून नंतर ती पलक्कडला गेली व तेथून बेपत्ता झाली. या प्रकरणी र्सवकष चौकशी करावी अशी मागणी माकचे एम. राजगोपाल यांनी केली असून खासदार पी. करुणाकरन यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती.