दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिक दीपक साठेंसह १८ जणांचा मृत्यू, तर १२३ प्रवासी जखमी झाले. त्यानंतर दीपक साठे यांचे चुलत बंधू निलेश साठे यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

“विमानाचे लँडिग गिअर कार्यरत नव्हते. दीपक साठे यांनी विमानाच्या तीन फेऱ्या मारून विमानात असलेलं इंधन संपवलं. विमानात इंधन नसल्यामुळेच त्याचा अपघात झाल्यानंतरही विमानानं पेट घेतला नाही. विमान खाली उतरवण्यासाठी विमानाचं इंजिन बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर तिनदा विमान आदळलं. परंतु मोठा अपघात होऊनही त्यावेळी धूर दिसला नाही आणि अनेकांचे प्राण वैमानिकांनी वाचवले,” असं निलेश साठे यांनी म्हटलं आहे. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर फेसबुक पोस्टद्वारे त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : राफेलची जबाबदारी असलेल्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते कॅप्टन दीपक साठे

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : टेबलटॉप रनवे म्हणजे काय? का मानला जातो हा रनवे धोकादायक?

“यापूर्वी ते हवाई दलात कार्यरत असतानाही हवाई दलाच्या विमान दुर्घटनेत ते जखमी झाले होते. त्यावेळी ते ६ महिने रुग्णालयात होते. त्यांचा झालेला अपघात हा इतका भीषण होता की ते पुन्हा विमान उडवतील असं कधीही वाटलं नव्हतं. परंतु इच्छाशक्ती आणि विमान उडवण्याच्या आपल्या प्रेमाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा चाचणी दिली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. दीपक साठे यांचे बंधू विकास साठे हेदेखील लष्करात कार्यरत होते. जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करताना ते शहीद झाले,” असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.