केरळमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात ८ मे ते १६ मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. केरळमध्ये बुधवारी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी राज्यात ४१ हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत देण्यात आलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण केरळ राज्य ८ मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते १६ मे पर्यंत लॉकडाउनमध्ये असेल. करोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जात आहे”.

आणखी वाचा- करोना रुग्णांचा नकोसा विक्रम! एका दिवसात ४ लाख १२ हजार ६१८ रुग्ण

केरळमध्ये बुधवारी सर्वाधिक ४१ हजार ९५३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केरळमधील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगताना करोनाला रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा- “मोदी काय म्हणतायत बघू आणि ठरवू”; करोनासंदर्भातील प्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उत्तर

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने राज्यात वॉर्डस्तरीय समिती तसंच रॅपिड रिस्पॉन्स टीम बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. केरळमध्ये आतापर्यंत १७ लाख ४३ हजार ९३२ नवे रुग्ण आढळले असून १३ लाख ६२ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.