केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये अनुजीत या तरुणाला ब्रेड डेड घोषित करण्यात आले. मात्र अनुजीतचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने आठ रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे. १४ जुलै रोजी २७ वर्षीय अनुजीत एका अपघातामध्ये जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र गंभीर दुखापत, डोक्याला लागलेला मार आणि पूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं. त्यानंतर अवयवदानाच्या माध्यमातून अनुजीतने मृत्यूनंतरही आठ जणांचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे २०१० साली वयाच्या १७ व्या वर्षी अनुजितने प्रसंगावधान दाखवल्याने एक रेल्वे अपघात टळला होता. यावेळेही त्याने शेकडो लोकांचे प्राण वाचवले होते.

नक्की वाचा >> देवमाणूस… रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरनेच ऑपरेशनपूर्वी केलं रक्तदान

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अनुजीतची नोकरी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये गेली. त्यानंतर तो एका सुपरमार्केटमध्ये काम करु लागला. १४ जुलै रोजी कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकारा येथे अनुजीतचा अपघात झाला. रात्री साडेअकरा वाजता कामावरुन घरी जात असतानाच अनुजीतच्या बाईकसमोर एक व्यक्ती आली. या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात अनुजीत बाईकवरुन खाली पडला आणि त्यातच त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर अनुजीतला कोट्टाराकारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्याला तिरुवनंतपुरममधील रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर तेथूनही त्याला किम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

फोटो: एएनआय

१७ जुलै रोजी अनुजीतला ब्रेन डेड घोषित करण्यात आल्यानंतर त्याची पत्नी प्रिंसी आणि बहीण अजल्याने अनुजीतचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अनुजीतला एक तीन वर्षांचा मुलगाही आहे. अनुजीतचे हृदय, आतडे, डोळे, छोटे आतडे, हात दान करण्यात आले आहेत. गरजू रुग्णांना मदत व्हावी म्हणून त्याच्या पत्नीने आणि बहिणीने हा निर्णय घेतला.

अनुजीतचे हृदय हे एकर्नाकुलममधील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या ५५ वर्षीय रुग्णाला देण्यात आलं आहे. आपत्कालीन मदतीसाठी तैनात करण्यात आलेल्या हेलिकॉप्टरच्या मदतीने हे हृदय एर्नाकुलम येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आलं.

फोटो: एएनआय

आरोग्यमंत्री शैलजा यांनी अनुजीतच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या संकटाच्या प्रसंगातही अनुजीतच्या कुटुंबाने प्रसंगावधान दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतल्याबद्दल शैलजा यांनी कुटुंबाचे कौतुक केलं आहे.

२०१० साली अनुजीत आणि त्याच्या मित्रांनी रेल्वे अपघात होण्यापासून रोखला होता. रेल्वे रुळांना तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर अनुजीतने ट्रेनच्या लोको पायलटला लाल रंगाची बॅग दाखवून धोक्याचा इशारा दिला. त्यामुळे तुटलेल्या रुळावरुन जाण्याआधीच रेल्वे थांबवण्यात आली. अनुजीतने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा रेल्वे अपघात थोडक्यात टळला होता. या घटनेनंतर अनुजीतचे राज्यभरातून कौतुक झालं होतं. अनुजीत हा केरळमधील अनेकांना या घटनेनंतर ओळखीचा चेहरा झाला होता. आता त्याच्या मृत्यूनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मात्र जाता जाताही तो आठ जणांना जीवनदान देऊन गेल्याबद्दल त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे कौतुक होताना दिसत आहे.