केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. केरळमध्ये सत्तेवर असलेल्या एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रण्टवर विरोधकांकडून टीका होत असून, मुख्यमंत्री विजयन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे.

केरळमधील करुणागप्पल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कारभारावर टीकास्त्र डागलं. प्रियंका गांधी म्हणाल्या, “केरळची लोकं हेच राज्याचं खरं सोनं आहेत. पण मुख्यमंत्री सोन्याची तस्करी करण्यात आणि विदेशी कंपन्यांना मासेमारीचे कंत्राट देण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री कॉर्पोरेट जाहीरनाम्याचं पालन करत असून, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांना राज्याची संपत्ती विकण्याचाच त्यांचा अजेंडा आहे,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

“तुमच्यासमोर तीन प्रकारच्या राजकारणाचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे शोषण, घोटाळे आणि हिंसाचार करणाऱ्या सीपीएमचं राजकारण. दुसरा द्वेषाचं आणि विभाजन करणारं भाजपाचं राजकारण. तर तिसरा पर्याय केरळच्या भविष्याची दृष्टी असलेलं काँग्रेसचं राजकारण. सीपीएमची मागील पाच वर्ष घोटाळे, दडपशाही आणि पक्षपातीपणाची होती,” अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली.

केरळ सरकारमध्ये नोकरीला असलेल्या स्वप्ना सुरेश ही अधिकारी महिला युएईमधील दूतावासाच्या मार्फत सोन्याची तस्करी करत असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) दूतावासातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर स्वप्ना सुरेश या अधिकारी महिलेचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर केरळ सरकारने त्यांना तातडीने निलंबित केलं होतं. केरळच्या राजकारणात हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.