केरळमध्ये कोचीजवळ मालवाहू जहाजाने मच्छीमारांच्या बोटीला धडक दिल्याची घटना रविवारी घडली. या घटनेत दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला असून घटनेनंतर एक मच्छिमार बेपत्ता झाला आहे. मालवाहू जहाज हे पनामा या देशातील असून हे जहाज कुठे जात होते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

कोचीतील किनारपट्टीजवळ अंबेर या मालवाहू जहाजाने मच्छिमारांच्या बोटीला धडक दिली. या दुर्घटनेत दोन मच्छिमारांचा मृत्यू झाला असून एक मच्छिमार बेपत्ता झाला आहे. बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यासाठी मोहीमही राबवली जात आहे. धडक झाली त्यावेळी बोटीत सुमारे १४ जण होते. यातील ११ जणांनी वेळीच पाण्यात उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत झालेल्या मच्छिमारांमध्ये एक जण थंबीदुराई तर दुसरा व्यक्ती हा मूळचा आसामचा रहिवासी असल्याचे समजते.  दरम्यान, अंबेर हे जहाज आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. जहाज नेमके कुठे जात होते हे गूढ अजूनही कायम आहे.

दुर्घटनेनंतर जहाजाच्या कॅप्टनने जहाजासह घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी तटरक्षक दल आणि नौदलाच्या पथकांनी शोधमोहीम राबवून जहाजाचा शोध घेतला. जहाजावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.