तरुवनंतपुरम : बलात्काराचा आरोप असलेल्या एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या (बिशप) अटकेच्या मागणीसाठी निदर्शनांमध्ये भाग घेणाऱ्या एका जोगिणीला (नन) केरळमधील कॅथॉलिक चर्चच्या धार्मिक परिषदेने बडतर्फ केले आहे.

वाहन चालवायला शिकणे, कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे आणि आपल्या कवितांचा संग्रह प्रकाशित करणे यांसारखे आरोप ठेवून लुसी कालापुरा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

बिशपच्या अटकेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्यामुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बातम्यांचा विषय झालेल्या ५३ वर्षांच्या लुसी कालापुरा यांना बडतर्फ करण्याचा निर्णय फ्रान्सिस्कन क्लॅरिस्ट काँग्रिगेशन (एफसीसी)ने ११ मे रोजी घेतला. त्यासाठी व्हॅटिकनच्या दिल्लीतील प्रतिनिधीमार्फत ५ ऑगस्टला ‘काँग्रिगेशन फॉर दि ओरिएंटल चर्चेस’ची मंजुरी त्यांना मिळाली होती.

‘‘मला १० दिवसांच्या आत जोगिणींचा मठ (कॉन्व्हेन्ट) सोडण्यास सांगण्यात आले आहे, मात्र मी ही जागा सोडणार नाही. गेल्या ३३ वर्षांपासून मी नन आहे आणि ते मला अशा रीतीने बडतर्फ करू शकत नाहीत. वकिलाचा सल्ला घेतल्यानंतर न्यायालयाचा मार्ग चोखाळण्याचा पर्यायही मी तपासून पाहणार आहे. मला लढायचे आहे, मात्र एक महिला म्हणून मला संरक्षण हवे आहे. गरज भासल्यास मी पोलीस संरक्षण मागेन’’, असे कन्नूरमधील करिक्कोट्टाक्करी येथील रहिवासी असलेल्या लुसी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला सांगितले.

कालापुरा यांना वारंवार इशारे देऊनही त्यांच्या जगण्याच्या शैलीत बदल झाला नाही. चर्चच्या अनेक प्रतिज्ञांचे उल्लंघन करणे त्यांनी सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांच्या बडतर्फीचा निर्णय घेणे आवश्यक ठरले, असे ‘एफसीसी’च्या सिस्टर अ‍ॅना जोसेफ यांनी म्हटले आहे.