News Flash

जगभरातल्या मल्याळींनी एका महिन्याचा पगार द्यावा: मुख्यमंत्री विजयन यांचं आवाहन

एका महिन्याचा पगार देणं शक्य नाही त्यांनी तीन दिवसांचा पगार दहा महिने द्यावा असा तोडगाही मुख्यमंत्र्यांनी सुचवला

(छायाचित्र : एएनआय)

पूरानं हाहाकार केलेल्या केरळच्या पुनर्वसनासाठी जगभरातल्या मल्याळींनी किमान एका महिन्याचे वेतन द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केले आहे. ज्यांना एका महिन्याचा पगार देणं शक्य नाही त्यांनी तीन दिवसांचा पगार दहा महिने द्यावा असा तोडगाही त्यांनी सुचवला आहे. फेसबुकच्या माध्यमातून विजयन यांनी हे आवाहन केले आहे. विजयन म्हणाले आहेत की, “नवीन केरळच्या निर्माणासाठी मल्याळींनी एकत्र यायला हवं. सरकारी खजिना ही केरळची ताकद नसून जगभरातून आधार ही केरळची खरी ताकद आहे.”

केरळची स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचा अंदाज पिनारायी विजयन यांनी व्यक्त केला आहे. केरळच्या बजेटमधील एका वर्षाच्या एकूण खर्चाच्या तरतुदीच्या म्हणजे 37,248 कोटी रुपयांच्या अर्ध्यापेक्षा जास्त ही रक्कम आहे. दरवर्षी रस्ते व पुलांच्या उभारणीसाठी जितकी रक्कम खर्च करण्यात येते, त्याच्या दुप्पट रक्कम पुरामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी लागणार आहे. केंद्र सरकारनं 21 ऑगस्ट रोजी तातडीची मदत म्हणून 600 कोटी रुपये दिले आहेत. जवळपास एका शतकातला सगळ्यात भयानक असा हा पूर होता. आठ ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान या पुरानं केरळच्या 14 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये थैमान घातलं, ज्यात 400 पेक्षा जास्त जणांनी प्राण गमावले. तसेच तब्बल 7,20,000 जणांना बेघर व्हावं लागलं.

ऑगस्ट महिन्यात 20 तारखेपर्यंत केरळमध्ये 771 मि.मि. इतका पाऊस पडला. दरवर्षीपेक्षा हे प्रमाण 179 टक्क्यांनी जास्त आहे. 80 पैकी 78 धरणं इतकी भरली की त्यांचे दरवाजे उघडावे लागले. यामुळे अर्नाकुलम, इडुकी, कोट्टयम, पाथनमथिट्टा, अलापुझ्झा व थ्रिसुर जिल्ह्यांमध्ये प्रचंड पूर आले. जवळपास 40 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली तर 26 हजार घरांचं अतोनात नुकसान झालं. कोचीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळही पाण्याखाली गेलं होतं. केरळच्या इतिहासात प्रथमच, शहरं व सखल भागांबरोबरच उंचावरील भागांचीही पूरानं वाताहत केली. केरळच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या प्रचंड आर्थिक मदतीमध्ये त्यामुळे जगभरातील मल्याळींनी आपला हात सढळ करावा नी एका महिन्याचा पगार द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री पिनारायी यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:56 am

Web Title: kerala cm piarayi vijayan appealed malayalis worldwide to donate one month salary
Next Stories
1 डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, पेट्रोलही महाग
2 सुरतमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू
3 जम्मू-काश्मीर: ‘कलम ३५ अ’ विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Just Now!
X