केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची टीका

तिरूअनंतपुरम : इटलीसह इतर करोनाग्रस्त देशातून परत येणाऱ्या भारतीय व्यक्तींना जर  करोनाची चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश नाकारण्याचा केंद्र सरकारचा आदेश असंस्कृतपणाचा आहे, अशी परखड टीका केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी केली आहे.

विजयन यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी रात्री पत्र पाठवले असून हवाई वाहतूक संचालनालयाने याबाबत जारी केलेले परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली आहे. या परिपत्रकात असे म्हटले आहे,की इटली किंवा दक्षिण कोरिया तसेच इतर करोनाग्रस्त देशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांकडे जर सीओव्हीआयडी १९ विषाणूची चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात येईल. त्या देशातील अधिकृत प्रयोगशाळांनी त्यांना तसे प्रमाणपत्र दिलेले असणे आवश्यक आहे. विजयन यांनी म्हटले आहे,की परदेशात अडकून पडलेल्या केरळच्या लोकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी विधानसभेच्या चालू अधिवेशनात एक ठराव करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार  कुठलीही भारतीय व्यक्ती  सीओव्हीआयडी १९ निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय मायदेशी  परत येऊ शकणार नाही. सरकारचा हा निर्णय असंस्कृतपणाचा असल्याचे विजयन यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना सांगितले. हे परिपत्रक मागे घ्यावे अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांनी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनाही पाठवले आहे. त्यात, जे लोक तिकिटे नोंदवून विमानतळावर अडकून पडले आहेत त्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

परदेशातील अधिकारी लक्षणे नसताना कुणाचीही चाचणी करायला तयार नाहीत, त्यामुळे तेथे या अडकून पडलेल्या भारतीयांची चाचणी करून त्यांना प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही. त्यामुळे प्रमाणपत्राशिवाय भारतात प्रवेश दिला जाणार नसेल तर त्यांना तेथेच रहावे लागेल हे अन्यायकारक आहे. इटलीच्या विमानतळावर अनेक भारतीय अडकून पडले असून त्यांना भारताकडे जाणाऱ्या विमानात प्रमाणपत्र असल्याशिवाय बसू दिले जात नाही अशी माहिती आमच्या हाती आल्याचे विजयन यांनी म्हटले आहे. लक्षणे असो किंवा नसो, हे प्रमाणपत्र भारत सरकारने सक्तीचे केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

कर्नाटकात ‘करोना’चा बळी?

बंगळूरु : करोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेला ७६ वर्षांचा एक वृद्ध बुधवारी कर्नाटकमधील कलबुर्गी येथे मरण पावल्याचे जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाने बुधवारी सांगितले.

जिल्हा मुख्यालयातील या विभागाच्या अधिकृत निवेदनानुसार, या वृद्धाचे नाव मोहम्मद हुसेन सिद्धिकी असून, त्याचा मंगळवारी एका सरकारी रुग्णालयात मृत्यू ओढवला. ‘त्याचे नमुने बंगळूरुतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप मिळायचा आहे’, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिद्धिकी  नुकताच सौदी अरेबियात यात्रेसाठी जाऊन तेथून परतला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.