केरळमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ओ एम जॉर्ज असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच काँग्रेसने जॉर्जची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

वायनाड जिल्ह्यातील पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी जॉर्ज यांच्या घरात एक आदिवासी कुटुंब घरकाम करायचे. या कुटुंबात १७ वर्षांची मुलगी देखील होती. गेल्या दीड वर्षांपासून जॉर्ज त्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. हे अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

पीडितेने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. जॉर्जने पीडित मुलीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. जॉर्जने पीडितेच्या कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यासाठी पैशांची ऑफर दिल्याचाही आरोप आहे.

जॉर्जविरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यापासून जॉर्ज पसार झाला आहे. आम्ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देणार नाही, असे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले. जॉर्ज यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.