न्यायालयाकडून होमिओपथी महाविद्यालयात रवानगी

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील हादिया या महिलेने आपल्याला पतीसमवेत राहावयाचे असल्याचे आणि आपल्याला आपले स्वातंत्र्य परत हवे असल्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने तिच्याशी चर्चा करून पुढील शिक्षणासाठी तिची रवानगी तामिळनाडूतील सालेम येथील होमिओपथी महाविद्यालयात केली.

धर्मातर करून शफीन जहान या मुस्लीम पुरुषाशी विवाह केलेल्या अखिला (आता हादिया) या केरळस्थित हिंदू मुलीने आपल्याला पुन्हा आपले स्वातंत्र्य हवे असल्याचे सोमवारी प्रथमच सर्वोच्च न्यायालयात हजर राहून सांगितले.

जवळपास दोन तास सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हादियाने आपल्याला पतीसमवेत राहावयाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने हादियाला, राज्य सरकारच्या खर्चाने शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे का, असे विचारले, तेव्हा आपल्याला शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, मात्र त्यासाठी लागणारा खर्च राज्य सरकारने करण्याची गरज नाही, आपला पती काळजी घेण्यास समर्थ असल्याचे सांगितले.

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील महिलेशी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी चर्चा केली आणि तिला होमिओपथीचा अभ्यासक्रम सुरू ठेवता यावा यासाठी तिची रवानगी तामिळनाडूतील सालेम येथे केली. हदियाला पुरेसे संरक्षण द्यावे आणि शक्य तितक्या लवकर ती सालेमला पोहोचेल याची खातरजमा करावी, असा आदेश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने केरळ पोलिसांना दिला.

सालेमस्थित होमिओपथी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना हदियाचे पालक म्हणून नियुक्त करण्यात आले असून कोणतीही समस्या उद्भावल्यास न्यायालयाशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. हादियाला महाविद्यालयात पुन्हा प्रवेश द्यावा आणि तिला वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, असा आदेश पीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठाला दिला. केरळ उच्च न्यायालयाने विवाह रद्द करण्याचा आदेश दिला, त्याविरुद्ध हादियाचा पती शफीन जहान यांनी याचिका केली असून त्यावर जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले.

धर्मातराचे वादग्रस्त प्रकरण आणि हिंदू महिलेने आपल्याशी केलेला विवाह याचा तपास करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिला होता तो मागे घेण्यासाठी जहान यांनी २० सप्टेंबर रोजी न्यायालयात धाव घेतली.

केरळ उच्च न्यायालयाने हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे सांगून सदर विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध जहान यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कट्टरतावादी गटांनी हादियावर प्रभाव टाकून तिला जबरदस्तीने धर्मातर करावयास भाग पाडले आणि विवाहाला तिची अनुमती नव्हती, अशी याचिका हादियाचे वडील के. एम. अशोकन यांनी केली होती. धर्मातर करण्यासाठी अथवा जहानशी विवाह करण्यासाठी आपल्यावर कोणताही दबाव आणण्यात आला नाही, असे हादियाने आपल्या जबानीत म्हटल्याचे एनआयएने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सालेमस्थित होमिओपथी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना हदियाचे पालक म्हणून नियुक्त करण्यात आले असून कोणतीही समस्या उद्भावल्यास न्यायालयाशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. हादियाला महाविद्यालयात पुन्हा प्रवेश द्यावा आणि तिला वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, असा आदेश पीठाने महाविद्यालय आणि विद्यापीठाला दिला.