19 March 2019

News Flash

केरळमधील दांपत्याने तीन कोटींची संपत्ती सरकारला केली दान, कारण जाणून व्हाल थक्क

आपल्यानंतर मानसिकदृष्या सक्षम नसलेल्या मुलीचं काय होईल अशी चिंता दांपत्याला वारंवार सतावत होती

गेली कित्येक वर्ष निवृत्त शिक्षक असलेल्या एन कमलासन (७७) आणि सी के सरोजिनी (७१) यांना आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता सतावत होती. आपल्यानंतर मानसिकदृष्या सक्षम नसलेल्या मुलीचं काय होईल, कोण तिची देखभाल करेल अशी काळजी त्यांना सतावत होती. पण गेल्या शुक्रवारी अखेर त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडलं. दांपत्याने आपलं घर केरळ सरकारला दान केलं असून, या घराचं रुपांतर असक्षम महिलांचा सांभाळ करणाऱ्या पुनर्वसन केंद्रात व्हावं. तसंच तिथे आपल्या ३७ वर्षीय मुलीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

कमलासन यांनी केलेली मागणी केरळ समाज कल्याण विभागाने मान्य केली असून कोल्लम जिल्ह्यातील त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. दोन मजली या घराचं बाजारमूल्य ३ कोटी रुपये आहे. समाज कल्याण मंत्री के के शैलजा यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘घराचं रुपांतर मानसिकदृष्या सक्षम नसलेल्या महिलांच्या पुनर्वसन केंद्रात होणार आहे. मात्र हे लगेच करणं शक्य नाही. सध्या घरात फक्त १० लोक राहू शकतात एवढीच जागा आहे. घरात काही बदल करुन ५० महिलांच्या राहण्याची सोय करण्यात येईल’.

कमलासन आणि सी के सरोजिनी यांनी केलेल्या विनंतीनुसार, घराला त्यांच्या मुलीचं म्हणजेच प्रिया असं नाव देण्यात येणार आहे. या पुनर्वसन केंद्रात घरगुती वातावरण मिळेल याची काळजी घेतली जाईल असं आश्वास शैलजा यांनी दिलं आहे. महिलांना घरात वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या दांपत्याचं हे सत्कर्म एवढ्यावरच थांबलेलं नाही. त्यांनी इच्छापत्र लिहिलं असून सरकारला आपल्या इतर दोन घरांचाही ताबा घेण्याची परवानगी दिली आहे या घरांचं बाजारमूल्य चार कोटी रुपये आहे. सध्या दांपत्य कोझिकोडे येथील घरात राहत आहे. इच्छापत्रानुसार, या ठिकाणी मानसिकदृष्ट्या असक्षम लोकांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यात यावं असं म्हटलं आहे.

First Published on June 13, 2018 1:45 pm

Web Title: kerala couple donates property to kerala government for daughter