करोनाशी मागील नऊ महिन्यांपासून लढा देणाऱ्या भारताला लसीच्या ड्राय रन सुरु झाल्याने थोडा दिलासा मिळत असतानाच आता पुन्हा एकदा नव्या संकटाची चाहूल लागली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालच नंतर आता केरळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. केरळने बर्फ फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यास्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आज केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

नक्की पाहा फोटोगॅलरी >> India Bird Flu : २५ मुद्द्यांमध्ये जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडलं

कोट्टायम जिल्हा प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार नींदूरमधील एका बदकांच्या पोल्ट्रीमध्ये बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आले आहेत. येथे १२०० हून अधिक बदकांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलप्पुझा जिल्ह्यातील कुट्टानद येथील काही पोल्ट्री फार्ममध्येही बर्ड फ्लूची प्रकरण समोर आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याने संसर्ग रोखण्यासाठी ४८ हजार पक्षी मारण्याचे आदेश जारी करेण्यात आले आहेत.

केरळचे वन्यजीव मंत्री के. राजू यांनी राज्यात बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आठ सॅम्पल्समध्ये विषाणू आढळल्याचे राजू यांनी म्हटलं आहे. बर्ड फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्वच पोल्ट्री फार्म आणि पक्षी उत्पादकांच्या पोल्ट्री बाजारांवर, जलाशये तसेच प्रवासी पक्षांच्या निवाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बर्फ फ्लूचे विषाणू आढळून न आलेल्या जिल्ह्यांमध्येही यंत्रणांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझामधील थालावेद्या, इडथ्थावा, पालिपड आणि थाजाकारा पंचायतींच्या हद्दीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळू आलेत. या ठिकाणी राज्य सरकारने विशेष तुकड्या नियुक्त केल्या आहेत. या परिसराच्या एक किलोमीटर परिघातील सर्व ४८ हजार पक्षी ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पक्षांचा मोबदला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असंही के. राजू यांनी सांगितलं आहे.

नक्की पाहा >> करोनाबरोबरच जपानमध्ये बर्ड फ्लूचाही उद्रेक; ११ लाख कोंबड्यांना मारणार

हरयाणात एक लाख कोंबड्या दगावल्या

हरयाणामधील अंबाला आणि पंचकूलाच्या दरम्यान असणाऱ्या बरनाला प्रदेशामध्ये एक लाखांहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना गाडलं तसेच जाळलं जात आहे. या कोंबड्यांच्या मृत्यू एच फाइव्ह एन वन या विषाणुमुळे झाल्याचा दावा केला जात आहे. काही कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून मंगळवार संध्याकाळपर्यंत यासंदर्भातील अहवाल येण्याची अपेक्षा आहे.

मध्य प्रदेशमध्ये ३७६ कावळ्यांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये २३ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान ३७६ कावळ्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४२ कावळे इंदूरमध्ये मृत्यूमुखी पडलेत. तसेच मंदसौरमध्ये १००, आगर-माळवामध्ये ११२, खरगोन जिल्ह्यात १३ तर सीहोरीमध्ये ९ कावळ्यांचा मृत्यू झालाय.

झालावाडमध्ये कलम १४४ लागू

राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ५०० हून अधिक पक्षी दगावल्याचे वृत्त आहे. यानंतर राजस्थानमध्येही बर्ड फ्लूसंदर्भात इशारा जारी करण्यात आला आहे. झालावाड येथे मरण पावलेल्या पक्षांचे नमुने चाचणीसाठी भोपाळमधील राष्ट्रीय उछ्च सुरक्षा पशुरोग संस्थेमध्ये पाठवण्यात आले होते. तिथेच या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे स्पष्ट झालं. झालावाडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

हिमाचलमधील मृत्यूही बर्ड फ्लूनेच

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यामधील पोंग येथील तलावाजवळ मृतावस्थेत सापडलेल्या पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळनंतर हिमाचल प्रदेश हे बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झालेलं चौथं राज्य ठरलं आहे. झील अभयारण्यामधील एक हजार ८०० हून अधिक स्थलांतरित पक्षी मरण पावले आहेत.