केरळ सध्या पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केरळला मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत असून रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ केरळमधील पत्रकार जक्का जॅकब यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत केरळमधील शिक्षणमंत्री रविंद्रनाथ बाहुबलीच्या स्टाइलमध्ये सामान आपल्या खांद्यावर वाहून नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ केरळमधील एका मदत छावणीमधील आहे.

रसायनाशास्त्राचे प्रशिक्षक राहिलेले रविंद्रनाथ खांद्यावरुन निळ्या रंगाची बॅग ट्रकमधून नेऊन गोडाऊनमध्ये ठेवत होते. रविंद्रनाथ यांच्यावर एर्नाकुलम जिल्ह्यामधील मदतकार्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र पुरामूळे ते त्रिशूरमध्येच अडकले आणि पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे नंतर त्यांना त्रिशूरमधील मदकार्याची जबाबदारी देण्यात आली.

केरळमध्ये पुरामूळे आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आतापर्यंत सर्वात भीषण पूर असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास १० हजार लोक पुरामूळे बेघर झाले होते. लोकांना आपलं घरं सोडून मदत छावणीत आश्रय घ्यावा लागला. पुरामूळे केरळ राज्याचं २१,०४३ कोटींचं नुकसान झालं आहे. पुराचं पाणी ओसरल्यानंतर हा आकडा अजून वाढला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे.