सी-व्होटरच्या जनमत चाचणीचे निष्कर्ष; ममता बॅनर्जी व जयललिता यांची सत्ता कायम राहण्याची चिन्हे

निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून २४ तास उलटण्याच्या आतच घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत चार राज्यांमध्ये सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत लक्षणीय बदल होणार असल्याचे सूचित केले आहे. सी-व्होटरने केलेली जनमत चाचणी आणि एका दूरचित्रवाणी वाहिनीने त्याचे केलेले प्रसारण यामधून ही बाब सूचित झाली आहे.

जवळपास पाच वर्षांच्या कालावधीनंतर केरळमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सत्तेवर येणार असल्याचे संकेत दिले आहेत तर आसाममध्ये भाजप आणि घटक पक्षांना सरकार स्थापनेसाठी साधे बहुमत मिळणार नसल्याचेही म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच सत्तेवर येणार असल्याचे पाहणीत आढळले असले तरी त्यांना अल्प बहुमत मिळेल, असे आढळले आहे. दक्षिणेकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूत सत्तारूढ अभा अद्रमुकला निम्म्या जागा जिंकण्यासाठी केवळ दोनच जागा कमी पडणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या नमुना चाचणीसाठी १४ हजार ३५३ जणांशी सल्लामसलत करण्यात आली. राज्य पातळीवर चुकीची शक्यता अधिक-उणे तीन टक्के तर विभागाच्या पातळीवर अधिक-उणे पाच टक्के इतकी आहे.

केरळमध्ये डाव्यांचा विजय निश्चित असल्याचा अंदाज असून त्यांना ४४.६ टक्के म्हणजेच एकूण १४० सदस्यांच्या विधानसभेत ८९ जागा डाव्यांना मिळणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसप्रणीत यूडीएफला सध्याच्या ७२ पैकी केवळ ४९ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. यावरून प्रस्थापितांविरुद्धच्या भावना तीव्र आहेत, असे स्पष्ट होते. या सरकारवर घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत.

आसाममध्ये सध्याच्या काँग्रेसप्रणीत सरकारला हादरा बसणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धूळ चारली जाणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे, काँग्रेसची चार टक्के मते कमी होणार असल्याने त्यांना ३४ जागांवर फटका बसणार आहे. त्यामुळे निम्म्या जागाही त्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांना ५७ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजपने आसाम गण परिषदेशी आघाडी करण्यापूर्वी ही चाचणी घेण्यात आली आहे. आसाम गण परिषदेची कामगिरी उत्तम झाल्यास भाजप सत्तेच्या जवळ जाईल असा अंदाज आहे.