केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिराच्या आवारात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीमधील मृतांचा आकडा १०८ वर जाऊन पोहचला आहे. तर ३०० हून अधिक भाविक आगीमध्ये जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पहाटे ३ च्या सुमारास ही भीषण आग लागली होती.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. कोल्लम दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत, तर जखमींना ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. पुत्तिंगल मंदिरात लागलेल्या आगीप्रकरणी केस दाखल करण्यात आली असून यासंबंधी तपास सुरु आहे. यावर लवकरचं अहवाल येईल, असे केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी म्हटलेय.
दरवर्षी मंदिरातील उत्सवाच्या निमित्ताने आतषबाजी करण्यात येते. यासाठी फटाक्यांचा मोठा साठा मंदिराजवळ करण्यात आला होता. त्यालाच आग लागून त्यामध्ये भाविकांचा मृत्यू झाला. मंदिराजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करू नका, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, स्थानिकांनी त्यांचे न ऐकल्यामुळे या भीषण दुर्घटनेला सामोरे जावे लागले. मंदिराच्या आवारात असलेली एक इमारतही या स्फोटामुळे कोसळल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. त्याखाली सापडूनही अनेक भाविक मृत पावले आहेत.
स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की मंदिराच्या एक किलोमीटर परिघातील घरांच्या काचा फुटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. फटाक्यांचा साठा मंदिराजवळील गोदामात करण्यात आला होता. या गोदामाजवळ असलेले अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाकडे मदतीसाठी आर्थिक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. केरळच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाशी संपर्क साधला आहे. निवडणूक आयोगाने मदतीसाठी निधी वापरण्याला परवानगी दिली आहे.
केरळातल्या आग दुर्घटनेच्या माहिती हेल्पलाईन- ०४७४२५१२३४४,९४९७९६०७७८,९४९७९३०८६९