केरळमधल्या भीषण पूरसंकटात लष्कर, नौदल आणि हवाई दलाबरोबर स्थानिक मच्छीमारांनीही बचाव मोहिमेत महत्वाचे योगदान दिले आहे. स्थानिक मच्छीमारांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका केली. आठ ऑगस्टपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे केरळमधल्या बहुतांश जिल्ह्यांना चहूबाजूने पुराच्या पाण्याने वेढले होते. अशावेळी सुरक्षा दलांबरोबर स्थानिक मच्छीमारांनी बचावकार्यात महत्वाची भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बचावकार्य राबवताना अनेक भागांमध्ये पाण्याच्या पातळीचा नेमका अंदाज नसताना फक्त कौशल्याच्या बळावर या मच्छीमारांनी अनेकांचे प्राण वाचवले. इदायारानमुला भागात मदतकार्य करणाऱ्या वालियावेली येथील मच्छीमारांच्या टीमने सांगितलेल्या अनुभवावरुन परिस्थिती किती भीषण होती त्याची कल्पना येते. इदायारानमुला भागात वातवरण अत्यंत खराब होते. आपत्ती येईपर्यंत आम्ही थांबू शकत नव्हतो. बोटींची दिशा भरकट होती. कसेबसे आम्ही रबराच्या झाडाला बोटी बांधल्या व अनेक नागरिकांची सुटका केली. यामध्ये ऑक्सिजन सिलिंडरवर असलेल्या एक व्यक्तिचाही समावेश होता असे जॅक मंडेला या मच्छीमाराने सांगितले.

अर्थुनकाल येथील मच्छीमारांच्या टीमला एर्नाकुलम जिल्ह्यातील अलानगड पंचायत येथे पाठवण्यात आले होते. आम्ही अलानगड पंचायतीमधील प्रत्येक घरामध्ये गेलो. सकाळपासून ते रात्री ११.३० वाजेपर्यंत आम्ही मदतकार्यात व्यस्त होतो. काही घरांमध्ये पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. त्या घरांमध्ये आम्ही पोहून हाका मारायचो. जेणेकरुन कोणी जिवंत असेल तर त्याला वाचवता येईल. एका ठिकाणी आम्ही गर्भवती महिला व तिच्या बाळाला वाचवले. कसेबसे तिने स्वत:ला तारले होते. आमच्या हाकेलाही प्रतिसाद देण्याच्या स्थितीमध्ये ती नव्हती असे डॉमनिक थॉमस या मच्छीमाराने सांगितले.

शिवसेनेकडून मदतीचा हात
केरळमधील पूरग्रस्तांसाठी पक्षाच्या सर्व खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा महत्वाचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. हा सर्व निधी केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीस दिला जाणार आहे. यासंबंधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली. केरळमधील पूरग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून मिळालेल्या निधीतून आवश्यक ती सामुग्री पाठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala fisherman paly important role in flood affected areas
First published on: 20-08-2018 at 12:59 IST