निसर्गसौंदर्यानं नटलेल्या देवभूमीवर वरुणराजाची अवकृपा झाली आहे. निसर्गाच्या कोपामुळे अर्ध केरळ पाण्याखाली गेलं आहे. हजारो लोक बेघर झालेत तर लाखो मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. गेल्या दोन आठवड्यात तीनशेहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. देशभरातूनच नाही तर जगभरातून मदतीचे हात केरळवासीयांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रातील देहविक्रय करणाऱ्या महिलांनीदेखील केरळवासीयांसाठी शक्य तितकी आर्थिक मदत जमा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजाच्या दृष्टीनं नेहमीच उपेक्षित असलेल्या या महिलांना जेव्हा केरळमधल्या भीषणतेची कल्पना आली तेव्हा माणुसकीच्या नात्यानं या महिलांनी जमेल तितका निधी गोळा करत मदतकार्यात खारीचा वाटा उचलला आहे. समाजानं आपल्याला नाकारलं असलं तरी या समाजाप्रती आपलं काहीना काही कर्तव्य नक्कीच असतं याची जाण ठेवत अहमदनगर येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी २१ हजारांचा निधी पंतप्रधान मदत निधीसाठी दिला आहे.

Kerala floods : अबुधाबीमधील भारतीय व्यावसायिकानं केरळवासीयांना केली तब्बल ५० कोटींची मदत

‘स्नेहालय’ या स्वयंसेवी संस्थेच्या दीपक बुराम यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार या महिन्याअखेर १ लाखांपर्यंतचा मदत निधी या महिला जमा करणार आहेत. महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ८ ऑगस्टपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. पहिल्यांदाच केरळमधल्या ३४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते. या महापूरात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण इथली भीषण परिस्थिती पाहता हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी मदत छावण्यांमध्ये आसरा घेतला आहे तर लाखो लोक बेघरही झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala flood maharashtra sex workers donate rs 21000 for victims
First published on: 21-08-2018 at 18:36 IST