केरळमध्ये घातलेल्या पुराच्या थैमानामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ३५७ जणांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहे. सुरक्षा जवानांकडून थोडीही विश्रांती न घेता बचावकार्य सुरु असून असंख्य लोकांना पूराच्या तडाख्यातून वाचवून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. हवाई दलाकडून यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावण्यात येत असल्याचे दिसत आहे. यामध्ये तटरक्षक दलाचेही मोठे योगदान असून त्यांनी या महाकाय पुरातून अवघ्या १० दिवसांच्या मुलाचे प्राण वाचविले आहे.

एका दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावर अडकलेले हे बाळ तटरक्षक दलातील जवानांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आहे. या बाळाला घराच्या कठड्यावरुन नेतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून दोन तरुण अतिशय हळूवारपणे बाळाला सुरक्षित ठिकाणी हलवत असल्याचे यामध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे या बाळाच्या आईलाही सुरक्षितपणे पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. या बाळाला आणि आईला बोटीत बसविण्यात आले आणि त्यानंतर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. त्यामुळे या चिमुकल्याला जीवदान मिळाल्याचा प्रत्यय याठिकाणी आला. तटरक्षक दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला असून हजारो जणांनी त्याला लाईक केले आहे. तर अनेकांनी याविषयीची आपली प्रतिक्रियाही दिली आहे.