केरळमध्ये मागील अनेक दिवसांपासून होत असणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र एकीकडे राज्यावर आस्मानी संकट आलेले असताना वेगवेगळ्या दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. अगदी बाचवकार्यात वाचवण्यात आलेल्या गर्भवती महिलेला वाचवण्यापासून ते केरळच्या दिशेने सुरु झालेले मदतीचा ओघ अशा अनेक प्रकारच्या सकारात्मक बातम्या अजूनही माणुसकी जिवंत असल्याची साक्ष देत आहेत. अशीच एक घटना मल्लपूरम तालुक्यामधील पूरग्रस्तांच्या मदत छावणीमध्ये घडली.

मल्लपूरम तालुक्यामधील या छावणीमध्ये शेकडो पुरग्रस्तांच्या तत्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे. याच पूरग्रस्तांच्या उपस्थितीमध्ये छावणीच्या बाजूलाच असणाऱ्या मंदिरामध्ये एक जोडप्याने रविवारी लग्नगाठ बांधली. एमएसपी स्कूल परिसरात राहणारी मात्र पुरामुळे छावणीचा आश्रय घ्यावा लागलेली अंजू आणि सैजू या दोघांनी पूरग्रस्तांच्या उपस्थितीतच आपले शुभ मंगल सावधान उरकले. छावणीजवळ असणाऱ्या तिरीपुंथरा मंदिरामध्ये हा आगळा वेगळा ‘लग्न सोहळा’ पार पडला. या लग्नाला अंजू आणि सैजूच्या पालकांबरोबर मोजके नातेवाईक आणि वऱ्हाड्यांच्या रुपात छावणीतील पूरग्रस्त उपस्थित होते.

लग्नाची तारीख आम्ही बऱ्याच आगोदरपासून ठरवलेली होती. मात्र जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे आम्ही राहतो त्या परिसरात पाणी साठले. सध्या आमची अर्ध्याहून अधिक घरे पाण्याखाली बुडालेली आहेत. पुरामुळे आम्ही लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला. मात्र आमची समस्या या छावणीतील लोकांना समजल्यानंतर त्यांनी आम्हाला पाठिंबा देत नियोजित तारखेलाच लग्न करण्यासाठी मदत केल्याने आम्ही या दोघांचा विवाह छावणीतील पूरग्रस्तांच्या उपस्थितीमध्ये लावून दिल्याची माहिती अंजूच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

तिरीपुंथरा मंदिर ट्रस्टनेही या लग्नासाठी बरीच मदत केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ट्रस्टने लग्नाला उपस्थित असणाऱ्यांसाठी खास जेवणाची सोय केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मल्लपूरम जिल्ह्यामधील निरुनावया आणि मिलांबूर येथील छावण्यांमध्येही अशाप्रकारे तरुण जोडप्यांनीही पूरसंकटाचे दु:ख बाजूला सारून लग्नगाठ बांधली.

केरळमध्ये सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांपैकी मल्लपूरम हा एक जिल्हा आहे. ८ ऑगस्टपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना नदीचे स्वरूप आले आहे. मल्लपूरम जिल्ह्यामध्ये प्रशासनाने १८३ मदत छावण्या उभारल्या असून ३० हजारहून अधिक पुरग्रस्तांना या छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.