तिरुअनंतपूरम : केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून इडुक्की व आजूबाजूच्या जिल्हय़ांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. इडुक्की धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता असून काही भागांत रस्ते खचले आहेत. लष्कराच्या तुकडय़ा मदतीसाठी बोलावण्यात आल्या असून पर्यटकांना धोक्याच्या भागात जाण्यापासून रोखण्यात येत आहे.

केरळच्या उत्तर भागात लष्कर तैनात करण्यात आले असून, तेथे कोझीकोड व वायनाड येथे अडकून पडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी लहान पूल बांधले जात आहेत. भारतीय नौदलाने दक्षिण नौदल कमांडला सतर्कतेचा आदेश दिला असून पेरियार नदीची पातळी वाढली आहे. वेलिंग्टन बेटे व कोची बॅकवॉटर्सचा काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ८ ऑगस्टपासून एकूण २९ लोकांनी प्राण गमावले असून, नैर्ऋत्य मान्सून केरळात उग्र झाला आहे. इडुक्की जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना पर्वतीय भागात जाण्यापासून रोखले असून जड वस्तूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुन्नार येथे प्लम जुडी रिसॉर्टवर तीस पर्यटक अडकले असून त्यात परदेशी लोकांचा समावेश आहे. त्यांना हलवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे, असे पर्यटनमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी सांगितले. त्यांना केरळ पर्यटन महामंडळाच्या निवासात हलवण्यात आले आहे. पेरियार व चेरुथोनी नद्यांच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. राज्यातील २४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

इडुक्की धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. चेरुथोनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. सव्वीस वर्षांनंतर काल प्रथमच इडुक्की धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी सांगितले, की पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून इडुक्की धरणातून आणखी पाणी सोडावे लागणार आहे. लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांची मदत सुरू आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केरळच्या पूरस्थितीचा आढावा घेतला, असे केंद्रीय मंत्री अल्फॉन्स कन्नमथनम यांनी सांगितले. एकूण १५६९५ लोकांना सुरक्षित ठिकाणी  हलवण्यात आले असून, त्यातील ५५०० लोकांना वायनाड येथून छावण्यांत हलवण्यात आले.