केरळमधील लष्कराच्या बचाव आणि मदत कार्याला केरळ सरकारकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप एका लष्करी गणवेश घातलेल्या व्यक्तीकडून व्हिडीओद्वारे करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ बनावट असून तो कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे पाठवू नये, असे आवाहन खुद्द लष्कराकडून करण्यात आले आहे.


भारतीय लष्कराचे अॅडिशनल डिरोक्टेरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन यांनी हे स्पष्ट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटले की, संबंधीत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या लष्कराच्या वेशातील व्यक्तीकडून बचाव आणि मदत कार्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. भारतीय लष्करासह सर्वांकडून या भयानक आपत्तीशी योग्य प्रकारे लढा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच लष्करासंबंधी असे व्हिडीओ व्हायरल होत असल्यास त्याची माहिती 91-7290028579 या क्रमांकावर देण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले आहे.

‘भारतीय महिला मोर्चा थलासेरी मंडलम’ या नावाच्या फेसबुक पेजवरुन गेल्या शनिवार आणि रविवारी हा व्हिडीओ सर्वाधिक शेअर करण्यात आला आहे. २८ हजार शेअर तर ६६०० लाईक्स या पेजला मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये लष्करी गणवेश घातलेल्या जवानाने केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री संपूर्ण बचावाचे काम लष्कराच्या हातात देण्यास तयार नाहीत. तुम्हाला लष्कराबद्दल इतका द्वेष का आहे? आम्हाला आमचे काम करु द्या, आम्ही तुमच्या राज्याचा कारभार हाती घेणार नाही, असे वचन आम्ही तुम्हाला देतो’ असे या व्हिडीओतील व्यक्तीने म्हटले आहे.