गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे.


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी १० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून ५ कोटींचा निधी मुख्यमंत्री मदत निधीसाठी तर उर्वरित ५ कोटी रुपये अन्न आणि आवश्यक वस्तूंच्या रुपात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली सरकारकडून १० कोटी, तेलंगणाकडून २५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केरळमधील पुरग्रस्तांसाठी देण्यात आले आहे. महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे साठेही दुषीत झाल्याची बाब लक्षात घेता केरळात अडीज कोटी रुपयांचे RO फिल्टर पाठवण्याचे आदेश तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच केंद्र सरकारने केरळसाठी १०० कोटी रुपयांच्यी मदत निधीची घोषणा यापूर्वीच केली आहे. तसेच आणखी मदत लागल्यास ती पुरवली जाईल असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे.

सतत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे गेल्या शंभर वर्षांतील सर्वात भीषण महापुराची स्थिती केरळमध्ये सध्या निर्माण झाली आहे. यामुळे संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. दैनंदिन कामकाज पूर्णपणे कोलमडून गेल्याने येथे खाण्यापिण्याच्या पदार्थ्यांसह गरजेच्या वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.