News Flash

इच्छा तिथे मार्ग ! एका मुलीला परीक्षेला जाण्यासाठी केरळ सरकारने चालवली ७० आसनी बोट

केरळ सरकारच्या तत्परतेचं सर्व स्तरातून कौतुक

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. परिस्थितीचा अंदाज घेत केंद्र आणि राज्य सरकार करोनाचा प्रभाव कमी असलेल्या काही भागांमध्ये आता हळुहळु रोजचे व्यवहार सुरु करायला सशर्थ परवानगी देत आहे. मात्र या काळात देशभरातील विद्यार्थ्यांना चांगलाच त्रास झाला. करोनामुळे परीक्षा सतत पुढे ढकलत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. अखेरीस काही भागांमध्ये ऑनलाईन तर काही भागांमध्ये सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली. केरळ हे भारतामधलं १०० टक्के साक्षरता असलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं. लॉकडाउन काळात केरळ सरकारने केवळ एका मुलीला परीक्षेला जाण्यासाठी ७० आसनी बोट सेवा सुरु करत आपलं राज्य साक्षरता आणि शिक्षणाच्या बाबतीत सजग असल्याचं दाखवून दिलं आहे.

केरळमधील अलापुझ्झा जिल्ह्यातील कैनाकारी भागात राहणाऱ्या १७ वर्षीय सँड्रा बाबू या मुलीला परीक्षेला जाण्यासाठी स्थानिक जल वाहतूक मंत्रालय धावून आलं. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सँड्रासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे पेपर देण्यासाठी जायचं कसं?? केरळमधील कैनाकारी हा भाग एका छोट्याश्या बेटासारखा असून लोकांना कुठेही प्रवासाला जायचं असेल तर बोटीशिवाय कोणताही पर्याय नसतो. सँड्राचे आई-वडील मजुरी करत असल्यामुळे तिच्यासाठी वेगळी सोय करण्याची त्यांची ऐपत नव्हती. अखेरीस स्थानिक जलवाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली असता, त्यांनी सँड्रासाठी परीक्षेच्या दरम्यान ७० आसनी बोट सुरु करण्याचं ठरवलं.

सँड्रा राहत असलेल्या ठिकाणापासून तिच्या परीक्षेचं स्थळ हे अंदाजे ३० किलोमीटर एवढं लांब आहे. तरीही सँड्राच्या परीक्षेसाठी बोटीतले ५ कर्मचारी तिच्यासोबत रोज प्रवास करत होते. सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी पेपर संपेपर्यंत ही बोट सँड्रासाठी थांबून असायची. महत्वाची गोष्ट म्हणजे या काळात सरकारी अधिकाऱ्यांनी सँड्राकडून सरकारी नियमाप्रमाणे दोन्ही वेळच्या प्रवासाचे मिळून १८ रुपये एवढंच भाडं स्विकारलं. बोटीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी केरळ सरकारला अंदाजे ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च येतो. तरीही केवळ एका मुलीच्या परीक्षेसाठी केरळ सरकारच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 7:36 pm

Web Title: kerala govt wins plaudits for running 70 seater boat to ferry lone girl to exam hall and back psd 91
Next Stories
1 शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2 गुप्त कारवायांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर; पाकिस्तानी गुप्तहेराचा खुलासा
3 “करोनाचा विषाणू निष्प्रभ होतोय”; इटलीच्या डॉक्टरांचा दिलासादायक निष्कर्ष
Just Now!
X