एखाद्या चित्रपटात निकषांचे पालन केले आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याचे प्रदर्शन स्थगित ठेवण्याचा अधिकार केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळास (सीबीएफसी) आहे, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने एस. दुर्गा (सेक्सी दुर्गा) या चित्रपटाच्या संदर्भात दाखल याचिकेवर दिला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे, की ‘एस. दुर्गा’ या चित्रपटाचे फेरपरीक्षण करण्याचे आदेश सीबीएफसीला देण्यात आले असून, त्यासाठीची प्रक्रिया तिरुअनंतपूरम येथील कार्यालयाने पूर्ण करायची आहे. त्यासाठी निकालपत्राच्या तारखेनंतर तीन आठवडय़ांची मुदत सीबीएफसीला दिली आहे. न्या. शाजी पी. शाली यांनी ‘एस. दुर्गा’ चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी सादर केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला आहे. सीबीएफसीने या चित्रपटाला प्रमाणित करण्यास स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने सीबीएफसीला सिनेमॅटोग्राफ (प्रमाणन) कायद्यानुसार कोणते अधिकार आहेत, याचा आढावा घेतल्यानंतर हा निकाल दिला आहे. सीबीएफसीला कुठल्याही चित्रपटाची पूर्ण तपासणी केल्याशिवाय तो स्थगित ठेवण्याचा  किंवा त्याचे प्रमाणन स्थगित ठेवण्याचा अधिकार आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.

निर्माते शाजी मॅथ्यू व दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांनी सांगितले, की सीबीएफसीने या चित्रपटाचे प्रमाणन २८ नोव्हेंबरला स्थगित केले असून, त्याची फेरतपासणी करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने मात्र गोवा इफ्फीमध्ये त्याचे प्रदर्शन करण्यास परवानगी दिली होती. सीबीएफसीला सिनेमॅटोग्राफ कायदा १९५२ अनुसार कोणत्याही चित्रपटाचे प्रमाणन रोखण्याचा अधिकार नाही. सीबीएफसीने द्वेषमूलक हेतूने या चित्रपटाचे प्रदर्शन गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मध्ये होऊ नये यासाठी प्रमाणन रोखले. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी २१ नोव्हेंबर रोजी गोवा चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यास परवानगी दिली होती.