३११ रुग्ण देखरेखीखाली; आणखी पाच जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

केरळमध्ये निपा विषाणूचा संसर्ग झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे केरळ सरकारने बुधवारी सांगितले. ज्या पाचजणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे, त्यांची प्रकृतीही वेगाने सुधारत आहे.

आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध जिल्ह्य़ातील ३११ रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांला बाधा झाली आहे त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला निपाचा संसर्ग झाल्याचे काल जाहीर करण्यात आले होते. रुग्णालयाने मंगळवारी रात्री जाहीर केल्यानुसार सदर विद्यार्थ्यांस ३० मे रोजी दाखल करण्यात आले असून  त्याची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, त्याचा तापही उतरत आहे. दरम्यान आणखी पाचजणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

वेगळ्या वॉर्डात ठेवलेल्या पाचजणांच्या रक्ताचे नमुने पुण्याला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले असून त्यांचे निष्कर्ष येणे बाकी आहे. असे असले तरी कलामसेरी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केलेल्या या पाचजणांची प्रकृती आणखी बिघडलेली नाही. त्यांच्यावर डॉक्टरांचे लक्ष असून त्यांच्या रक्ताच्या चाचण्या नकारात्मक येतील अशी आशा आहे. रक्ताची चाचणी सकारात्मक आली तरच निपाचे उपचार सुरू केले जातात. विषाणूच्या अधिशयन कालापर्यंत यात वाट पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी या रुग्णांवर ताप खोकल्याचे उपचार सुरू आहेत. विषाणूची लागण ते लक्षणे दिसणे या दरम्यानचा काळ हा अधिशयन काळ असतो. तो ४ ते १४ दिवस आहे.

सोमवारपासून शैलजा येथेच तळ ठोकून आहेत. जिल्ह्य़ातील ३११ लोकांना यावेळी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. संसर्ग झालेला विद्यार्थी हा एर्नाकुलममधील उत्तर परावूरचा रहिवासी आहे. तो इडुक्की जिल्ह्य़ात थोडुपुढा येथे एका महाविद्यालयात शिकत आहे. त्याला ताप आला असतानाही तो त्रिचूर जिल्ह्य़ात इतरांसमवेत प्रशिक्षणासाठी गेला होता.

२०१८ मध्ये १७ बळी

१९ मे २०१८रोजी निपा विषाणूचा मल्लापूरम जिल्ह्य़ातील कोझीकोड येथे प्रसार झाला होता. त्यावेळी कोझीकोड येथे १४ तर मल्लापूरममध्ये ४ असे एकूण १७ बळी गेले होते.

निपाची लक्षणे

  • श्वसनमार्गात संसर्ग
  • मेंदूज्वर
  • ताप
  • डोकेदुखी
  • वांत्या
  • घशाचा संसर्ग