पोलीस दलातील एक सहकारी गेल्या ३० वर्षांपासून आपला छळ करीत असल्याची तक्रार पोलीस सेवेतील एका महिला अधिकाऱ्याने केल्याने राज्यात नवा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. श्रीलेखा यांनी फेसबुकवरून परिवहन आयुक्त टी. जे. थाचनकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. थाचनकरी गेल्या २९ वर्षांपासून म्हणजेच नागरी सेवा प्रशिक्षणाच्या काळापासून आपला छळ करीत असल्याचा आरोप श्रीलेखा यांनी केला आहे. मात्र परिवहन आयुक्तांनी या आरोपाचे खंडन केले आहे.
दक्षता न्यायालयाने अलीकडेच श्रीलेखा यांच्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यामागे थाचनकरी यांचा हात असल्याचा आरोप श्रीलेखा यांनी केला आहे. श्रीलेखा परिवहन आयुक्त असताना त्यांनी खासगी बसगाडय़ांना शाळेच्या बसगाडय़ांचा परवाना देण्याचा निर्णय घेतल्याने सरकारी तिजोरीचे नुकसान झाल्याचे थाचनकरी यांचे म्हणणे आहे.
सरकार, न्यायालय अथवा पोलीस दलाविरोधात काहीही वक्तव्य केलेले नाही, मात्र फेसबुकवर जे काही मांडले आहे त्याच्याशी आपण ठाम आहोत, असे श्रीलेखा यांनी म्हटले आहे.