करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांनी लॉकडाउन वाढवला. मात्र, अनेक राज्य आता अनलॉकबद्दलही विचार करू लागली आहेत. परंतु घराबाहेर पडताना नियम पाळावेच लागतील, असा कडक दंडक आता अनेक राज्य सरकार करू लागले आहेत. केरळ सरकारने तर लॉकडाउन काळातील काही नियम हे वर्षभर पाळावे लागतील, असा आदेशही काढला आहे.

केरळ सरकारने रविवारी ही घोषणा केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. सरकारच्या नव्या आदेशांनुसार वर्षभर लॉकडाउनचे नियम लागू असतील. प्रत्येकाला घराबाहेर पडताना मास्क घालावाच लागेल. सहा फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्वत्र काटेकोर पालन करावं लागेल.

लग्न समारंभांवरही ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल. शिवाय अंत्यविधीलाही केवळ २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

कोणत्याही प्रकारचे समारंभ, मेळावे, धरणे आंदोलन, निदर्शने करण्यासाठी लेखी परवानगी घ्यावी लागेल. त्यातही १० पेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही, असेही केरळ सरकारने स्पष्ट केले.

इतर राज्यात प्रवास करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पासेसची आवश्यकता नसेल. परंतु, त्यासाठई ई-प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल, असेही सरकारने जाहीर केले आहे.